Tokyo Olympics : केवळ अकरा मिनिटांत खेळ खल्लास

टोकियो – माजी जगज्जेत्या बेल्जियम संघाने भरात असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा 5-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. बेल्जियमकडून स्टार स्ट्रायकर अलेक्झांडर हेनरीक्सने हॅट्ट्रिक करत भारताच्या आव्हानातील हवाच काढून टाकली. अखेरच्या 11 मिनिटांत भारतीय संघाचा बचाव फोल ठरल्याने पराभव झाला.
आता भारतीय संघाला ब्रॉंझपदकासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. भारताचा या पदकासाठीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया व जर्मनी यांच्यातील पराजीत संघाशी होणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताने गेल्या 41 वर्षांत पदक मिळवलेले नाही. यंदा संघ उपांत्य फेरीचा अडथळा पार करत सुवर्ण किंवा रजत पदकाचा मानकरी ठरेल अशीच कामगिरी संघाने केली होती. मात्र, बेल्जियमविरद्धच्या सामन्यात भारताचे आक्रमण अपयशी ठरले तर बचावही अपुरा ठरला. 1980 साली भारताने मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. मात्र, सुवर्ण किंवा रजत पदकाची आशा संपली असली तरीही भारतीय संघाला ब्रॉंझपदकाची संधी आहे.
हा सामना सुरू झाला तेव्हा पहिल्या क्वॉर्टरमध्ये पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमने पहिला गोल करून भारताविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताच्या हरमनप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर एकाच मिनिटांनी भारताच्या मनदीप सिंगने रिव्हर्स स्टिकने गोल करत संघाची आघाडी 2-1 अशी वाढवली. भारतीय संघाने पहिल्या 15 मिनिटांच्या खेळातच 2-1 अशी आघाडी घेऊन बलाढ्य बेल्जियमवर दडपण राखले होते. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये बेल्जियमने दिमाखात पुनरागमन करत गोल केला व सामन्यात 2-2 अशी बरोबरी केली.
दुसऱ्या हाफमध्ये तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांनी केलेले गोलचे प्रयत्न अपयशी ठरले. सामना अद्याप 2-2 अशा बरोबरीतच होता. चौथ्या क्वॉर्टरमध्ये बेल्जियमने तिसरा गोल करून 3-2 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर बेल्जियमने चौथा गोल करून 4-2 अशी मोठी आघाडी वाढवली. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना पाचवा गोल करून 5-2 अशा विजयासह त्यांनी अंतिम फेरी गाठली. बेल्जियमकडून हॅट्ट्रिक साकारत अलेक्झांडर हेनरीक्सने सरस कामगिरी केली.





