Road Safety World Series | इंडिया लेजण्ड्स अंतिम फेरीत

रायपूर – रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी-20 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात इंडिया लेजण्ड्सने वेस्टइंडीज लेजण्ड्सचा 12 धावांनी पराभव केला. मास्टर ब्लास्टर कर्णधार सचिन तेंडुलकर व सिक्सर किंग युवराज सिंहच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हा विजय मिळाला.
प्रथम फलंदाजी करताना इंडिया लेजण्ड्सने 3 बाद 219 धावा केल्या. वेस्टइंडीजच्या संघाला 20 षटकांमध्ये 206 धावावर रोखत रोमहर्षक विजय मिळवला. येत्या रविवारी अंतिम सामना होईल.
विजयासाठी 220 धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीजच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी आपल्या विकेट गमावल्या. ड्वेन स्मिथने (63) या मालिकेतील पहिले अर्धशतक फटकावले स्मिथने नरसिंह देवनरेन (59) याच्यासह 99 धावांची भागीदारी केली मात्र, तरीही ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
120 धावांवर तीन गडी गमावल्यानंतर कर्णधार ब्रायन लाराने देवनरेनच्या साथीत चौथ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना वेस्टइंडिज लेजण्ड्सचा संघ अपयशी ठरला. देवनरेनने 44 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार ठोकले, लाराने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. इंडिया लेजण्ड्सकडून विनय कुमारने दोन तर, इरफान पठाण, मनप्रीत गोनी व प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंडिया लेजण्ड्सने तेंडुलकरच्या 65 धावा तर, युवराजसिंगच्या 20 चेंडूत 1 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद 49 धावांच्या जोरावर 3 बाद 219 धावा उभारल्या. वीरेंद्र सेहवागने 35 व महंमद कैफ 27 यांनीही उपयुक्त फलंदाजी केली.





