भारताचा ऐतिहासिक संरक्षण करार: HAL ला मिळाली सर्वात मोठी ऑर्डर, सैन्याला मिळणार 156 मेड-इन-इंडिया हेलिकॉप्टर!

Light Combat Helicopter: केंद्र सरकारने शुक्रवारी आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार मंजूर केला आहे. यात 156 मेड-इन-इंडिया लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) ‘प्रचंड’ खरेदीचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, हा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत घेण्यात आला. या कराराची किंमत तब्बल 62,000 कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात संरक्षण मंत्रालयाने 2.09 लाख कोटी रुपयांहून अधिकच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार आहे. मीडियाशी बोलताना एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) साठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे. हे हेलिकॉप्टर कर्नाटकमधील बेंगलुरू आणि तुमकूर येथील HAL च्या प्लांटमध्ये बनवले जातील.
या 156 हेलिकॉप्टरांचे वाटप भारतीय सेना (90) आणि भारतीय वायुसेना यांच्यात होईल. ही हेलिकॉप्टर चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर वापरली जातील. यामुळे देशात नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि एयरोस्पेस क्षेत्राला चालना मिळेल. HAL ला गेल्या वर्षी जूनमध्ये या 156 हेलिकॉप्टरसाठी टेंडर मिळाले होते.
‘प्रचंड’ म्हणून ओळखले जाणारे LCH हे जगातील एकमेव असे हेलिकॉप्टर आहे, जे 5,000 मीटर उंचीवर उतरू आणि उड्डाण करू शकते. यामुळे ते पूर्व लडाखमधील सियाचिन ग्लेशियरसारख्या उंच भागात काम करण्यासाठी योग्य आहे. सरकार मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत संरक्षण उत्पादनात स्वावलंबनावर भर देत आहे.





