Sunny Deol : ‘भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी…’; अभिनेता सनी देओलचं वक्तव्य “एकमेकांशी जोडलेले नसलो, तरी…”
Sunny Deol : पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं अभिनेत्याला त्याला पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं, तेव्हा सनी देओलनं सावध पवित्रा घेत भाष्य करणं टाळलं.

Sunny Deol : बंटवारा १९४७ या सिनेमामुळे अभिनेता सनी देओल चर्चेत आहे. सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू असून अशाच एका प्रमोशन कार्यक्रमादरम्यान सनी देओलने वडिलांची आठवण सांगताना एक वक्तव्य केलं असून या वक्तव्यामुोळे अभिनेता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
बिहारमधील पाटणा येथे आयोजित पत्रकार परिषद सिनेमावर भाष्य करताना सनी देओलने वडिलांच्या एका विधानाचा दाखला दिला. पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं अभिनेत्याला त्याला पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं, तेव्हा सनी देओलनं सावध पवित्रा घेत भाष्य करणं टाळलं. (Sunny Deol)
पत्रकाराने पाकिस्तानातील सध्याच्या परिस्थितीसंदर्भात अभिनेत्याला प्रश्न केला. या प्रश्नावर अभिनेत्याने थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. सनी देओल म्हणाला “बघा, मला त्या सर्व गोष्टींच्या खोलात जायचं नाही, आम्ही कलाकार आहोत, आम्ही सिनेमे बनवतो. आम्ही कथा निवडतो आणि त्यातून आशय मांडतो.” (Sunny Deol)
पुढं अभिनेता म्हणाला, “आम्ही त्या गोष्टींचं राजकारण करत नाही, आणि आम्हाला ते करायचंही नाही. म्हणूनच मी त्या विषयावर (पाकिस्तानवर) बोलणार नाही.” असं त्यानं स्पष्ट शब्दांत सांगितलं. मात्र, यानंतर त्याने वडिलांच्या सांगितलेल्या आठवणीची सर्वाधिक चर्चा मनोरंजन विश्वासह सर्वत्र रंगली आहे. (Sunny Deol)
भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित असलेल्या या सिनेमाचं शुटिंग शेजारच्या देशात झालेलं का? असा प्रश्न सनी देओलला विचारण्यात आला. यावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला, “नाही, याचं शुटिंग तिथे (पाकिस्तानमध्ये) झालेलं नाही, हा सिनेमा पूर्णपणे भारतातच शूट करण्यात आलाय. आम्ही अशा भावनांचा अतिविचार करत नाही, कारण संपूर्ण राष्ट्र एकेकाळी एकच होतं.”
नेमकं काय म्हणाला सनी देओल?
पुढं अभिनेत्याने वडिलांच्या एका वक्तव्याचा दाखला देत म्हणाला, माझे वडील नेहमी म्हणायचे, “भारत ही माझी आई आहे आणि पाकिस्तान ही माझी मावशी आहे…” तुम्हाला हे सर्व माहीतच आहे. जरी आपण सध्या एकमेकांशी जोडलेले नसलो, तरी मुळात आपण एकच आहोत…” असं वक्तव्य केलं.
दरम्यान, ‘बटवारा १९४७’ या सिनेमाची कथा फाळणीनंतरच्या काळातील पार्श्वभूमीवर आधारित एका कुटुंबाची भावनिक कथा आहे. या कथेतून सनी देओल एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा १४ अॅागस्ट या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमातून डिम्पल गर्ल प्रीती झिंटा तब्बल ८ वर्षांनी बॅालिवूडमध्ये कमबॅक करत आहे. त्याव्यतिरिक्त या सिनेमात शबाना आझमी, अली फजल आणि अभिमन्यू सिंह यांसारखे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी केलं आहे.






