भारत 6Gच्या दिशेने वाटचाल करतोय; डिजिटल क्षेत्रात जगाच्या पुढे राहील – आकाश अंबानी

नवी दिल्ली – डिजिटल क्षेत्रात पायाभूत सुविधापासून विविध उपयोगी उपकरणापर्यंत भारत आत्मनिर्भर झाला आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात भारत सदैव पुढे राहणार असल्याचे मत रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी व्यक्त केले.
इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये बोलताना अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीजने 5- जी क्षेत्रात भारताला आघाडीवर ठेवले आहे. आता कंपनी 6 जी तंत्रज्ञानावर काम करीत आहे. या क्षेत्रातही भारत जगाच्या पुढे असेल याची काळजी घेतली जाईल. मोबाईलमुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये अमुलाग्रह बदल झाला आहे. लोक पैशाचे व्यवहार वेगात करत आहेत. विचारांची, माहितीची देवाणघवाण वेगात करीत आहेत.
त्याचा एकूणच अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. मोबाईल तंत्रज्ञानातील कोणतीही बाब भारत परदेशातून आयात करत नाही. त्याचबरोबर सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात भारताने आगेकूच करायचे ठरविले आहे. त्यामुळे भारतातील मोबाईल क्षेत्र जगाच्या पुढे कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतातील केवळ मोबाईल वापरणार्यांची संख्या वाढत नाही तर इंटरनेट वापरणार्यांची संख्या वाढत आहे. यामुळे तरुण इंटरनेटचा वापर करून अभ्यास आणि इतर बाबी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





