#ENGvIND ODI Series : टी-20 नंतर आता एकदिवसीय मालिकेचा थरार

लंडन – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज यजमान इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामने खेळणार आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर या मालिकेतही भारतीय संघाचेच वर्चस्व राहणार असून पहिल्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाचेच पारडे जड राहील.
इंग्लंडला त्यांचा नियमित कर्णधार इयॉन मॉर्गन याची उणीव भासणार आहे. त्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती व आता त्याच्या जागी जोस बटलरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या मालिकेत इंग्लंड संघात अष्टपैलू बेन स्टोक्स, ज्यो रूट आदी प्रमुख खेळाडू संघात परतले असले तरीही हे दोघे वगळता त्यांच्या खेळाडूंना टी-20 सामन्यांच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.
रूट व स्टोक्स यांनी कसोटीत सरस कामगिरी केली होती, आता ते मर्यादित षटकांच्या मालिकेत कशी कामगिरी करतात यावर त्यांचे यश अवलंबून राहणार आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत मोठ्या खेळी केलेला नवोदित कर्णधार बटलर टी-20 मालिकेत अपयशी ठरला होता त्यामुळे या मालिकेत त्याच्याही कामगिरीकडे लक्ष राहणार आहे. जॉनी बेअरस्टो, मोईन अली, जेसन रॉय, डेव्हीड मिली व लियाम ल्व्हिंगस्टोन यांच्यावरच त्यांची मदार राहणार आहे. गोलंदाजीत मोईन अलीसह विली व रीस टोपली यांनाच भारताच्या बलाढ्य फलंदाजीला रोखण्याचे काम करावे लागणार आहे.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर टी-20 सामन्यांच्या मालिकेतील कामगिरीतील सातत्य याही मालिकेत कायम ठेवावे लागेल. नियमित कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली व ऋषभ पंत यांचे अपयश संघाला जास्त महागडे ठरत आहे. मात्र, सूर्यकुमार यादवने अखेरच्या टी-20 सामन्यात शतक फटकावल्यामुळे भारताला मधल्या फळीत भक्कम फलंदाज मिळाला आहे. त्याच्या जोडीला अष्टपैलू हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर व रवींद्र जडेजा हे भरात असल्यामुळे इंग्लंडसमोरचे आव्हान मोठे आहे. त्यातच या मालिकेद्वारे संघात पुनरागमन केलेल्या सलामीवीर शिखर धवनच्याही कामगिरीकडे लक्ष राहील.
भारतीय संघाची गोलंदाजी यजमान संघापेक्षा जास्त सरस वाटत आहे. अनुभवी गोलंदाज महंमद शमी संघात परतला असून त्याच्या जोडीला जसप्रीत बुमराह व महंमद सिराज असल्याने वेगवान गोलंदाजीचा ताफा जास्त सशक्त झाला आहे. त्यातच नवोदित अर्शदीप सिंगच्या समावेशाने गोलंदाजीत विविधता आली आहे. फिरकीची जबाबदारी यजुवेंद्र चहल व जडेजा यांच्यावरच असली तरीही अक्सर पटेललाही संधी मिळू शकते.
धवनच्या कामगिरीकडे लक्ष
सलामीवीर फलंदाज शिखर धवनने मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन केले आहे. या मालिकेद्वारे त्याला पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. या मालिकेनंतर धवनच्याच नेतृत्वाखालील भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार असल्याने धवनला मोठ्या जबाबदारीचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघाच्या सराव सत्रात त्याने कसून सराव केला असला तरीही त्याला प्रत्यक्ष सामन्यात मोठी खेळी करत आपली निवड सार्थ ठरवावी लागेल.


