कोरोना विषाणूची बाधा झालेला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला

कोची : जगभर धडकी भरवणाऱ्या कोरोना विषाणूचा पहिला बाधीत केरळात आढळला आहे. तो वुहान विद्यापीठात शिकत आहे. सरकारी वृतसेवा पीबीआयने ही माहिती दिली आहे.
या रूग्णाची कोरोना विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्याला रुग्णालयात विलगता कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थीर असून त्याच्यावर बारकाईने वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान केरळचे आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी तातडीने आरोग्य संचनालायाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जगभराला धोका निर्माण झालेल्या कोरोना विषाणूचा उगम चीनमधील वुहान येथे झाल्याचे मानण्यात येते. आता पर्यंत त्यात 170 जणांचे बळी गेले आहेत.
केरळमध्ये त्रिसूर, थिरुवनंतपूरम, पठाणमथ्थीला आणि मल्लपुरम येथे प्रत्येकी एक संशयित रुग्ण आढळला. त्यांना विविध रुग्णालयात विलगता कक्षात ठेवण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भारत सरकारच्या आरोग्य खात्याने अनेक जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे. चीनमधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी विमानतळावरच करण्यात येत आहे.
काय आहे कोरोना विषाणू
2019 -नोव्हल कोरोना हा कोर्न व्हायरसचे घातक रूप आहे. यापुर्वी ते मानवात आढळत नव्हते. विषाणूंच्या व्यापक कुटूंबातून कोरोना व्हायरस आला आहे. सामान्य थंडीतापापासून असंख्य गंभीर आजार त्यापासून होऊ शकतात. श्वसनाचे विकार होऊन श्वास घेण्यास बाधा येऊ शकते.
हा विकार जनावरांपासून माणसांत संक्रमित झालेला म्हणजे झूनॉटीक प्रकारातील आहे.
या विषाणूंचा नेमका उगम अद्याप शोधता आले नाही. यापुर्वी मांजरांपासून माणसात आणि उंटापासून माणसात विषाणूंचे संक्रमण झाले आहे.
जेंव्हा या विषाणूंची माणसांत लागण झाल्याचे लक्षात आले त्यावेळी त्यापासून होणाऱ्या आजारांची फारशी कल्पना करता आली नव्हती. मात्र खोकला, तपा ते किडनी निकामी होण्यापर्यंत अनेक विकार त्यापासून होत असल्याचे आढळून आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने खालील आजार कोरोना विषाणूंमुळे होऊ शकतात असे जाहीर केले आहे.
1) ताप
2) खोकला, सर्दी
3) श्वसनास त्रास
4) न्युमोनिया
5) किडनी निकामी होणे
या विषाणूमुळे मृत्यू होऊ शकतो.





