भारतीय लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के तर जलस्त्रोत केवळ 4 टक्के, विकसित होण्यासाठी पाणीपुरवठा आवश्यक – अमिताभ कांत

नवी दिल्ली – भारताने नजीकच्या भविष्यात विकसित होण्याचा संकल्प केला आहे. यासाठी भारताला अनेक आघाड्यावर प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी भारताला पुरेसे पाणी उपलब्ध होईल की नाही याची खात्री करावी लागणार आहे, असे जी -20 चे शेरपा अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.
भारतासमोर सध्या पिण्याच्या पाण्याचा बराच प्रश्न आहे. आगामी काळामध्ये या आघाडीवर आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर हा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक विकासाकडे दुर्लक्ष होऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमात बोलताना कांत यांनी सांगितले की, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल 17 टक्के एवढी लोकसंख्या भारतात राहते. मात्र जगातील एकूण ताज्या पाण्याच्या पुरवठ्यातील भारताकडे केवळ चार टक्के पाणी स्त्रोत आहेत.
यावरून गरज आणि लोकसंख्या यातील असंतुलन किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. आगामी काळात जर आपल्याला कृषी क्षेत्राचे आणि औद्योगिक उत्पादन वाढवायचे असेल तर त्या प्रमाणात आपल्याला पाणी लागणार आहे. ते पाणी कसे उपलब्ध करायचे यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, सध्या भारताची अर्थव्यवस्था जवळपास चार लाख कोटी डॉलरची आहे. आपल्याला 30 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था पाहिजे आहे. पाणी किती प्रमाणात उपलब्ध आहे, त्यावरच हे अवलंबून आहे. इतर बाबीचे व्यवस्थापन जास्त सहजासहजी केले जाऊ शकणार आहे. आपण सध्या हा मुळात प्रश्नच नाही असे गृहीत धरून वाटचाल करीत आहोत. मात्र हा प्रश्न आगामी काळात गंभीर रुप धारण करू शकेल. आहे त्या पाण्याचे संवर्धन करणे, नवे पाण्याचे स्त्रोत उभारणे, यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणे या बाबीवर आपल्याला काम करावे लागणार आहे.





