India GDP Growth: पहिल्या तिमाहीत जीडीपीत 7.8% वाढ, कृषी आणि सेवा क्षेत्राचा मोठा वाटा

India GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून 2025) जबरदस्त कामगिरी केली आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्थिर मूल्यांवर देशाचा जीडीपी 47.89 लाख कोटी रुपये इतका नोंदवला गेला, जो मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील 44.42 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 7.8 टक्क्यांनी अधिक आहे. ही वाढ गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपेक्षा (2023-24) सर्वाधिक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के होता.
या क्षेत्रांनी दाखवली चमक
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कृषी, पशुपालन, वनीकरण आणि मत्स्यपालन क्षेत्राचा वाढीचा दर 3.7 टक्के नोंदवला गेला, जो मागील वर्षी याच तिमाहीत 1.5 टक्के होता. वित्तीय, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राची वाढ 6.6 टक्क्यांवरून 9.5 टक्क्यांवर पोहोचली. व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणाशी संबंधित सेवांचा वाढीचा दर गेल्या वर्षीच्या 5.4 टक्क्यांच्या तुलनेत 8.6 टक्क्यांवर गेला. याशिवाय, उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राची वाढ 7.7 टक्के नोंदली गेली, जी मागील वर्षी 7.6 टक्के होती. लोक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवांचा वाढीचा दर 9.0 टक्क्यांवरून 9.8 टक्क्यांवर पोहोचला.
या क्षेत्रांत घट –
सरकारी आकडेवारीनुसार, वीज, गॅस, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्तता सेवांच्या वाढीच्या दरात मोठी घट दिसून आली आहे. हा दर 0.5 टक्क्यांवर घसरला, जो मागील वर्षी याच तिमाहीत 10.2 टक्के होता. खाण क्षेत्राचा वाढीचा दर शून्यापेक्षा 3.1 टक्के खाली गेला, म्हणजेच या क्षेत्रात गतिविधींमध्ये घट नोंदवली गेली. मागील वर्षी याच तिमाहीत खाण क्षेत्राची वाढ 6.6 टक्के होती.
दरम्यान, कृषी आणि सेवा क्षेत्राच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था स्थिर आणि सशक्त वाटचाल करत आहे. तथापि, खाण आणि उपयुक्तता सेवांसारख्या क्षेत्रांतील आव्हानांवर लक्ष देण्याची गरज आहे. ही कामगिरी भारताच्या आर्थिक प्रगतीचा सकारात्मक संदेश देत आहे.


