Economic Survey : भारताचा अन्नटंचाईपासून विक्रमी उत्पादनापर्यंतचा प्रवास; अन्नधान्य उत्पादन सातपटीने वाढले
Economic Survey : 1950-51 मधील 5.08 कोटी टनांवरून भारताचे अन्नधान्य उत्पादन 2025-26 मध्ये 37.65 कोटी टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. हरित क्रांतीमुळे उत्पादनक्षमता वाढली.

Economic Survey : भारताने स्वातंत्र्योत्तर काळात अन्नटंचाईपासून अन्नधान्य उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. 1950-51 मध्ये 5.08 कोटी टन असलेले अन्नधान्य उत्पादन 2025-26 मध्ये 37.65 कोटी टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच 75 वर्षांत उत्पादनात सातपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
1951 मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे 36.1 कोटी होती. त्यावेळी अन्नधान्य उत्पादन मर्यादित असल्याने देशाला अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. आर्थिक सर्वेक्षणातील ऐतिहासिक आकडेवारीनुसार, 1950 च्या दशकात अन्नधान्य उत्पादनात दरवर्षी सरासरी 3.22 टक्के वाढ झाली. या वाढीमागे अन्नधान्य लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार हा प्रमुख घटक होता.
मात्र, 1960 च्या दशकात उत्पादनवाढीचा वेग कमी होऊन वार्षिक 1.72 टक्क्यांवर आला. त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची आयात करावी लागली. या काळातील अन्न संतुलनाच्या आकडेवारीतही भारताचे आयातीवरील अवलंबित्व स्पष्टपणे दिसून येते.
हरित क्रांतीने बदलली परिस्थिती –
1970 चे दशक भारताच्या अन्नधान्य उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरले. हरित क्रांतीमुळे सुधारित बियाणे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला. त्याचा सर्वाधिक परिणाम सुरुवातीला गहू आणि त्यानंतर तांदळाच्या उत्पादनावर झाला. 1970-71 ते 1979-80 या काळात गव्हाच्या उत्पादनात वार्षिक 4.69 टक्के वाढ झाली. याच काळात तांदळाचे उत्पादन 1.91 टक्के, तर भरड धान्यांचे उत्पादन 0.74 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे, कडधान्यांच्या उत्पादनात 0.54 टक्क्यांची घट झाली.
विशेष म्हणजे उत्पादनवाढीच्या तुलनेत लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार मर्यादित राहिला. 1950-51 ते 1997-98 या काळात अन्नधान्य लागवडीखालील क्षेत्र सुमारे 27 टक्क्यांनी वाढले; मात्र उत्पादनात तब्बल 279 टक्क्यांची वाढ झाली.
यातून उत्पादनक्षमता वाढल्याचे स्पष्ट होते. 1950-51 मध्ये अन्नधान्याचे सरासरी उत्पन्न सुमारे 522 किलो प्रति हेक्टर होते. ते 1997-98 मध्ये 1,552 किलो प्रति हेक्टरवर पोहोचले. त्यानंतरही उत्पादकतेत वाढ कायम राहिली. 2019-20 मध्ये 2,343 किलो प्रति हेक्टर असलेले सरासरी अन्नधान्य उत्पन्न 2025-26 मध्ये 2,646 किलो प्रति हेक्टरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.





