व्यापार युद्धाचा भारताला हादरा जाणवला; दागिने निर्यातीत 5,183 कोटींचा फटका

मुंबई – व्यापार युद्धामुळे फेब्रुवारी महिन्यात भारताची दागिने निर्यात 23 टक्क्यांनी कमी होऊन 2,422 दशलक्ष डॉलर म्हणजे 21,085 कोटी रुपये इतकी झाली आहे. मंदी आणि व्यापार युद्धामुळे चीन, अमेरिका इत्यादी देशातून मागणी कमी झाल्यामुळे दागिने निर्यातीवर परिणाम झाला असल्याचे दागिने निर्यातदार प्रोत्साहन परिषदेने म्हटले आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 3,166 दशलक्ष डॉलर म्हणजे 26,268 कोटी रुपयांची निर्यात झाली होती. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत दागिने निर्यात 13 टक्क्यांनी कमी होऊन 25,732 दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 29,724 दशलक्ष डॉलरच्या दागिन्यांची निर्यात झाली होती.
हिर्याच्या किमतीत 15 टक्क्यांनी घट झाल्यामुळे मूल्यात दागिन्यांची निर्यात कमी झाली असल्याचेही सांगण्यात आले. या परिस्थितीतही दागिने निर्यात वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या संबंधात आमच्या काही मागणी आम्ही सरकारकडे सादर केल्या असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.





