भारताचा आजपासून सराव सामना

हॅमिल्टन : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत व्हाइटवॉश स्वीकारलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आजपासून न्यूझीलंड अ संघाविरुद्ध तीन दिवसांचा सराव सामना सुरू होत आहे. खेळाडूंकडून झालेल्या चुका सुधारण्यावर भारताला भर द्यावा लागणार असून त्यानंतर होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सरस कामगिरीसाठी संघाला सज्ज व्हावे लागणार आहे.
न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आल्यानंतर भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20

मालिकेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना यजमान संघाला 5-0 असा व्हाइटवॉश दिला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा वचपा काढताना 3-0 असा व्हाइटवॉश देत हिशेब बराबर केला. एकदिवसीय मालिकेत भारताच्या फलंदाज व गोलंदाजांना आश्‍चर्यकारक अपयश आले. जे गोलंदाज गेल्या वर्षीपासून वर्चस्व राखून होते, तेच एक गडी बाद करण्यासाठी देखील यशस्वी ठरले नाहीत. जगातील सर्वात नावाजला जात असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला तर संपूर्ण मालिकेत एकही बळी मिळविता आला नाही.

केवळ गोलंदाजीच सुमार झाली असे नाही तर क्षेत्ररक्षणातही अनेक चुका झाल्या. पहिला सामना मोठी धावसंख्या उभारूनही भारताला गमवावा लागला होता, तर दुसऱ्या सामन्यात संघ विजय मिळवेल अशी शक्‍यता निर्माण झाली असतानाच कुलदीप यादवने रॉस टेलरचा सोपा झेल सोडला व त्याने त्यानंतर मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत शतकी खेळी केली व न्यूझीलंडला मालिका जिंकून दिली.

या सराव सामन्यात संघात दाखल झालेल्या रविचंद्रन अश्‍विनसह रवींद्र जडेजा, यजुर्वेंद्र चहल व कुलदीप यांना कसोटी मालिकेपूर्वी उपयुक्त सराव करण्याची संधी आहे. बुमराह, महंमद शमी यांच्या जोडगोळीला उमेश यादव व नवदीप सैनी यांच्यासह कसोटी सामन्यापूर्वी आपल्या गोलंदाजीतील उणिवा दूर करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. कर्णधार विराट कोहली एकदिवसीय मालिकेत साफ अपयशी ठरल्याने भारतीय संघाची फलंदाजीची चिंता वाढली आहे. टी-20 व एकदिवसीय मालिका तसेच यापूर्वी आणि गतवर्षी झालेल्या मालिकांमध्ये प्रचंड भरात असलेल्या लोकेश राहुलला वगळण्यात आल्याने मयांक आग्रवालसह सलामीला कोण येणार हा प्रश्‍न संघव्यवस्थापनाला सतावत आहे.

पृथ्वी शॉ, शुभमन गिल यांना संधी देण्यात येण्याची शक्‍यता असली तरीही आगामी कसोटी मालिका लक्षात घेता उपलब्ध खेळाडूंमधून पृथ्वीच आग्रवालसह डावाची सुरुवात करेल. भरात असलेल्या रोहित शर्माला दुखापतीने हा दौरा सोडून मायदेशी परतावे लागल्याने तसेच शिखर धवनही जायबंदी असल्याने सलामीचा प्रश्‍न भेडसावत आहे. चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य राहाणे, वृद्धिमान साहा व हनुमा विहारी यांच्यातील एकाला बाहेर बसावे लागणार आहे.

तरीही संघाची सध्याची फलंदाजी पाहता मधली फळी भक्कम आहे. कोहलीचे अपयश सलत असले तरीही तो देखील धावांसाठी आतूर झाला आहे. जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील ही मालिका असल्याने भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वी या सराव सामन्यातून हरविलेला आत्मविश्‍वस परत मिळवावा लागणार आहे. कोहलीचा संघ सराव सामन्यात न्यूझीलंडच्या अ संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो यावरच संघाचे कसोटी मालिकेतील यशापयश
अवलंबून आहे.
न्यूझीलंड अ विरुद्ध चुका सुधारणार
पंतला स्थान का नाही – जिंदाल
भारतीय संघात वारंवार संधी देऊनही यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 तसेच एकदिवसीय मालिकेत संघात स्थान का देण्यात आले नाही, अशी विचारणा आयपीएलच्या दिल्ली संघाचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी केली आहे. जर पंतला खेळवायचेच नव्हते तर त्याला न्यूझीलंडला काय खुर्ची गरम करायला नेले होते का? असा सवालही जिंदाल यांनी केला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.