सीरियात स्थैर्य, भोगोलिक एकात्मता अबाधित रहावी; भारताने व्यक्त केली अपेक्षा

नवी दिल्ली – सीरियामधील अध्यक्ष बशर अल असाद यांचे सरकार उलथवून टाकण्यात आल्यानंतर तेथील स्थैर्य, एकात्मता, सार्वभौमत्व आणि भोगोलिक अखंडत्व अबाधित रहावे, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे. सीरियातील घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. तेथील राजकीय घडामोडींमध्ये सीरियातल्या नागरिकांचा पुढाकार असावा, अशी आशा आहे, असेही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
भारतीय नागरिकांचे रक्षण आणि सुरक्षिततेसाठी राजधानी दमास्कसमधील भारतीय दूतावासाकडून भारतीय समुदायाशी संपर्क ठेवला जातो आहे. रविवारी बंडखोरांनी दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर लगेचच भारतीय दूतावासाकडून भारतीय समुदायाच्या सुरक्षेसाठीच्या हालचाली सुरू केल्या असून तेथे असलेले सर्व भारतीय सुरक्षित आहेत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हयात तहरिर-अल-शाम या बंडखोरांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर असाद यांची जवळपास १४ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. याबद्दल अनेक आघाडीच्या देशांनी समाधान व्यक्त केले आहे. सीरियातील नागरिकांनी आता भविष्यातील आपल्या देशाची उभारणी करावी, असे अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे.
तर सीरियातील घटनाक्रम अनपेक्षित असून तेथील अल्पसंख्य आणि नागरी हक्कांचे रक्षण व्हावे, असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्हटले आहे. सीरियातील सत्तांतराचे फ्रान्सनेही स्वागत केले असून तेथे कट्टरवाद स्वीकारला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.





