दहशतवादी हाफीज सईदला ताब्यात देण्याची भारताची पाकिस्तानकडे मागणी

इस्लामाबाद – पाकिस्तानात वास्तव्याला असलेला दहशतवादी हाफीज सईद याला भारताच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने आता पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नावरून गरळ ओकण्यास सुरूवात केली आहे. हाफीज सईद हा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड असून भारताला तो हवा आहे.
दरम्यान, भारताने सईदला ताब्यात देण्याची मागणी केल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या प्रमुख माध्यमांनीही ठळक प्रसिध्दी दिल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत आणि पत्रकार परिषद घेत वेगळ्याच विषयांवर चर्चा सुरू केली आहे. त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलुच पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, जोपर्यंत भारत काश्मीर विषयावर चर्चा करत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत होणार नाहीत.
भारताचे लष्कर काश्मीरात राहणाऱ्या नागरिकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना हाफीज सईदबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यावर मात्र काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. बातम्यांच्या आधारावर केल्या जाणाऱ्या अशा प्रश्नांवर आपण काही बोलणार नाही आणि असे प्रश्न विचारले जाऊ नयेत असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय योग्य ठरवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. भारताने हे अत्यंत चुकीचे केले असल्याचे व त्या विरोधात आम्ही संयुक्त राष्ट्रांत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्या म्हणाल्या.





