India – China : भारत, चीनकडून सकारात्मक कल; चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : भारत आणि चीनकडून एकमेकांना सहकार्य करण्याबद्दल सकारात्मक कल दाखवला जातो आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांकडे भागीदार म्हणून बघितले पाहिजे, शत्रू म्हणून बघायला नको, यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. दोन दिवसांच्या भारत भेटीवर आलेल्या वांग यी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबरच्या बैठकीदरम्यान हे प्रतिपादन केल्याचे चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार आहेत. त्यापुर्वी वांग यी भारत भेटीवर आले आहेत.
परस्परांमधील सहकार्य पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने भारत – चीन संबंधांमध्ये सकारात्मक कल दिसून येतो आहे. भारत आणि चीन दरम्यान उच्चस्तरिय संबंध प्रस्थापित होण्याला या वर्षी ७५ वर्षे पुर्ण होत आहेत. भूतकाळापासून धडा घेण्याची ही वेळ आहे, असेही वांग यी यांनी जयशंकर यांना सांगितले. पूर्व लडाखमध्ये लष्करी कोंडी निर्माण झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून दोन्ही देशांमधील संबंध गोठले आहेत. त्या अनुषंगाने ते बोलत होते.
दोन्ही बाजूंनी योग्य धोरणात्मक धारणा असणे अत्यंत आवश्यक आहे, एकमेकांना प्रतिस्पर्धी किंवा धमक्यांऐवजी भागीदार आणि संधी म्हणून पहावे आणि विकासात गुंतवणूक करावी. दोन्ही देशांनी परस्पर आदर विश्वासाच्या आधारे शेजारी देशाशी सहजीवनासाठी योग्य मार्गांचा अवलंब करावा, असेही ते म्हणाले. मुक्त व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. जगात वेगाने फेरबदल होत आहेत. एकतर्फीपणे धमकावण्याचे सत्र सर्रास सुरू आहे, असे म्हणून त्यांनी अमेरिकेवरही टीका केली.
आशियाला स्थिरता मिळण्यासाठी
मै६, गांभीर्य, परस्परांचा फायदा आणि सर्वसमावेशकतेच्या तत्वांचा अंगिकार करायला चीन उत्सुक आहे. भारतासह शेजारी देशांशी मिळून काम करायची चीनची इच्छा आहे. संयुक्तपणे शांततामय, सुरक्षित, समृद्ध, सुंदर आणि मित्रत्वाचे घर उभारायला चीन तयार आहे. दोन्ही देशांनी आत्मविश्वासाने राहावे, एकाच दिशेने वाटचाल करावी, अडथळे दूर करावेत, सहकार्य वाढवावे आणि द्विपक्षीय संबंधांची सुधारित गती मजबूत करावी. पूर्वेकडील दोन महान संस्कृतींचे पुनरुज्जीवन परस्परांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे आशिया आणि संपूर्ण जगाला निश्चितता आणि स्थिरता मिळू शकते, असेही वांग यी म्हणाले.





