India-Canada FTA : भारत-कॅनडा मुक्त व्यापार करार: संवेदनशील क्षेत्रे वगळून वाटाघाटींवर लक्ष केंद्रित करणार!
India-Canada FTA : वाटाघाटींची तिसरी फेरी ओटावा येथे सुरू आहे. जर एखादी गोष्ट कॅनडासाठी संवेदनशील असेल, तर ती करारात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. त्याचप्रमाणे, जर एखादी गोष्ट भारतासाठी संवेदनशील असेल, तर त्यावर डोकेफोड करण्यात काही अर्थ नाही.

India-Canada FTA : भारत आणि कॅनडाने प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये सोप्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याचा, आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये सवलती मागणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
वाटाघाटींची तिसरी फेरी ओटावा येथे सुरू आहे. जर एखादी गोष्ट कॅनडासाठी संवेदनशील असेल, तर ती करारात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. त्याचप्रमाणे, जर एखादी गोष्ट भारतासाठी संवेदनशील असेल, तर त्यावर डोकेफोड करण्यात काही अर्थ नाही.
अशा करारांनुसार, भारत कृषी-वस्तू आणि दुग्धव्यवसाय यांसारख्या क्षेत्रांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देत नाही. प्रस्तावित करारासाठीच्या वाटाघाटी वर्षाअखेरीस पूर्ण करण्याच्या विचारात दोन्ही बाजू आहेत. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार सध्याच्या 17 अब्ज डॉलर्सवरून 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्यही ठेवले आहे.
गोयल यांनी असेही सांगितले की, त्यांनी सरकारी प्रतिनिधी, व्यावसायिक, गुंतवणूक कंपन्या, पेन्शन फंड आणि विमा कंपन्यांची भेट घेतली. कॅनेडियन कंपन्यांकडून गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले की, भारत बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी ओळखला जातो.भारतात तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे, जिथे सुमारे 2.3 लाख कंपन्या स्टार्टअप म्हणून नोंदणीकृत आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, एआय, क्लीनटेक, ग्रीटेक आणि डीप टेक यांसारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यासाठी प्रचंड क्षमता आहे. ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅनच्या अध्यक्ष आणि सीईओ जो टेलर यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान, त्यांनी पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, वित्तीय सेवा, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रांमधील भारतातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. गोयल यांनी सीपीपी इन्व्हेस्टमेंट्सचे अध्यक्ष आणि सीईओ जॉन ग्रॅहम यांचीही भेट घेतली.





