India WTC Scenarios : गॉल कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, पण फायनलची आशा अजूनही टांगणीला ‘हे’ आव्हान असणार सर्वात कठीण
India WTC Scenarios : श्रीलंकेविरुद्धच्या दमदार विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताची स्थिती सुधारली आहे.

IND vs SL Galle Test Win WTC Points Table WTC 2027 Final Scenarios : भारतीय क्रिकेट संघाने गॉल आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान श्रीलंकेचा १६५ धावांनी धुव्वा उडवत शानदार विजय मिळवला आहे. युवा फिरकीपटू मानव सुथार आणि शतकवीर देवदत्त पडिक्कल यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना खिशात घातला. या दमदार विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताची स्थिती सुधारली आहे. या विजयानंतर भारताला महत्त्वपूर्ण १२ गुण मिळाले असून, संघाच्या विजयाची टक्केवारी (PCT) वाढली आहे.
डब्ल्यूटीसी गुणतालिकेची ताजी स्थिती; बांगलादेश भारताच्या पुढे –
जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५-२०२७ च्या ताज्या गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया संघ ७७.७८% पीसीटीसह अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका ७५.००% गुणांसह दुसऱ्या आणि न्यूझीलंड ७२.२२% गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून धक्का देणारा बांगलादेशचा संघ ६६.६७% पीसीटीसह चौथ्या स्थानावर असून तो भारताच्या पुढे आहे. श्रीलंका दौऱ्यातील पहिला सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघ ५३.३३% पीसीटीसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे.
फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला काय करावे लागेल?
A clinical victory for #TeamIndia in the Galle Test.
Manav Suthar’s 6 wicket haul in the second innings, guides India to a 165 run win over Sri Lanka.
Scorecard – https://t.co/M9LVyCAp8y #SLvIND pic.twitter.com/QxAhFQGZke
— BCCI (@BCCI) August 19, 2026
भारतीय संघाला या सायकलमध्ये अजून ८ कसोटी सामने खेळायचे आहेत. यामध्ये श्रीलंकेविरुद्धचा एक उर्वरित कसोटी सामना, त्यानंतरचा न्यूझीलंड दौरा आणि अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणारी ५ सामन्यांची हाय-व्होल्टेज कसोटी मालिका समाविष्ट आहे. भारताने उर्वरित सर्व सामने जिंकल्यास संघाचे जास्तीत जास्त १६० गुण आणि ७४.०७% पीसीटी होईल. अव्वल दोन संघांमध्ये (Top 2) स्थान मिळवून फायनल गाठण्यासाठी भारताला आता इथून अत्यंत सावध आणि आक्रमक खेळ करावा लागणार आहे.
८ पैकी किमान ७ सामने जिंकणे अनिवार्य –
फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला उर्वरित ८ पैकी किमान ७ किंवा सर्व ८ सामने जिंकावे लागतील. जर भारताने ६ सामने जिंकले, १ ड्रॉ केला आणि १ गमावला, तरीही संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. म्हणजेच, आगामी तीन कसोटी मालिकांमध्ये भारताला फक्त एकच सामना गमावण्याची मुभा असेल. जर भारतीय संघ दोन सामने हरला, तर फायनलचे स्वप्न भंग होईल. याशिवाय, स्लो ओव्हर रेटच्या पेनल्टीपासून (Over Penalty) वाचणेही भारतासाठी तेवढेच महत्त्वाचे ठरेल.





