SAFF Championship 2026 : मैदानात प्रतिस्पर्धी, पण हृदयात आदर! भारत-पाकच्या खेळाडूंनी सामन्यानंतर एकमेकांना दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’
SAFF Championship 2026 : मंगळवारी ढाका येथे झालेल्या सॅफ चॅम्पियनशिप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने १० खेळाडू असलेल्या पाकिस्तानी संघाचा २-१ ने पराभव करून विक्रमी १० व्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांना 'गार्ड ऑफ ऑनर' सादर केला.

SAFF Championship 2026 Final India Beats Pakistan Guard Of Honour : बांगलादेशातील ढाका येथील नॅशनल स्टेडियमवर मंगळवारी खेळल्या गेलेल्या सॅफ चॅम्पियनशिप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ असा पराभव करत विक्रमी दहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या रोमांचक विजयानंतर दोन्ही देशांच्या खेळाडूंनी परस्पर आदराचे अनोखे उदाहरण सादर करत एकमेकांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन संपूर्ण क्रीडा विश्वाची मने जिंकली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रथम भारताने दाखवला मोठेपणा, त्यानंतर पाकिस्ताननेही टाळ्या वाजवून केले स्वागत –
अंतिम शिटी वाजताच सर्वप्रथम भारतीय खेळाडूंनी रांगेत उभे राहून पाकिस्तानी संघाचा सन्मान केला. याला तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकवर्गानेही विक्रमी दहाव्यांदा चॅम्पियन ठरलेल्या भारतीय संघासाठी टाळ्यांचा कडकडाट केला. या चुरशीच्या लढतीत दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या पाकिस्तानला भारताने २-१ ने नमवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
क्रिकेटमधील तणावपूर्ण वातावरणापेक्षा फुटबॉल मैदानावर वेगळेच चित्र –
Pakistan team gave guard of honor after India won the SAFF Championship final.
Sports spirit.
https://t.co/pxwciN3nKw
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) November 17, 2026
गेल्या दीड वर्षापासून क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर क्रिकेटपटू एकमेकांशी हस्तांदोलन करणेही टाळत असताना, फुटबॉल मैदानावरील या दिलदार दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रशिक्षक नौशाद मुसा यांनी स्पर्धेपूर्वीच दिला होता बंधुभावाचा संदेश –
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक नौशाद मुसा आणि बचावपटू नाथन रॉड्रिग्स यांनी ५ नोव्हेंबरच्या साखळी सामन्यापूर्वीच पारंपरिक अभिवादन करण्याचे स्पष्ट केले होते. गरज पडल्यास पुढे होऊन मिठी मारू, असे सांगणाऱ्या मुसा यांच्या भूमिकेनंतर कर्णधार बिजॉय वर्गीजने पाकिस्तानी कर्णधार युसूफ इजाज बटशी हस्तांदोलन केले होते, ज्यात भारताने ३-२ असा विजय मिळवला होता.





