आणखी तीन देशांच्या नागरीकांना भारतात बंदी

नवी दिल्ली – आरोग्य मंत्रालयाने 11 मार्च 2020 आणि 16 मार्च 2020 रोजी जारी केलेल्या प्रवासविषयक मार्गदर्शक तत्वांच्याच पुढचा टप्पा म्हणून आज अतिरिक्त मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. यानुसार अफगाणिस्तान, फिलिपीन्स, मलेशिया या देशातून भारतात येण्यावर त्वरित बंदी घालण्यात आली आहे.
या देशातून भारतात आता एकही विमान येणार नाही. सर्व संबंधित विमान कंपन्यांनी याची नोंद घेऊन, उड्डाणे रद्द करायची आहेत. ही बंदी तातडीने अंमलात येत आहे. या देशातून येणाऱ्या कोणत्याहीं विमानाला भारतात अनुमती असणार नाही.
ही बंदी 31 मार्च पर्यंत लागू राहणार आहे. त्यानंतर स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल असे भारत सरकारने म्हटले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी भारत सकारने युरोपिय समुदायातील देश, तुर्की आणि ब्रिटन या देशांच्या प्रवाशांना भारतात येण्यास बंदी घातली होती. त्यांच्यावरची बंदीही 31 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. अनेक देशांच्या जहाजांनाहीं भारतीय किनाऱ्यांवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.





