India A Tour of Australia 2024 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ऋतुराजकडे नेतृत्व तर ईशानसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी…

India A Tour of Australia 2024 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची (बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी) कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारत-अ संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारत-अ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रुतुराज गायकवाडवर सोपविली आहे. या कालावधीत एकूण दोन प्रथम श्रेणी सामने खेळवले जातील. तसेच एक सराव सामना होणार आहे. ज्यामध्ये भारत-अ संघ ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध दोन सामने खेळेल. एक सामना भारत-अ संघाचा इंट्रा स्क्वॉड सामना असेल. जो भारतीय वरिष्ठ संघाविरुद्ध खेळला जाईल. हा दौरा 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
पुणेकर ऋतुराजकडे मोठी जबाबदारी…
बीसीसीआयने पुणेकर ऋतुराज गायकवाड याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तर अभिमन्यू इश्वरन याला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऋतुराज सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्रचं नेतृत्व करतोय. तसेच ऋतुराजने इराणी कप स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडियाचे देखील नेतृत्व केले होते. ऋतुराज सध्या शानदार कामगिरी करतोय. ऋतुराजने रणजी स्पर्धेतील सामन्यात मुंबई विरुद्ध 87 चेंडूत शतकी खेळी केली.
इशान किशनचे पुनरागमन…
इशान किशनही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परतला आहे. इशान किशनचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून ईशान किशन टीम इंडियाच्या संघाबाहेर आहे. अखेर त्याला आता संधी मिळाली आहे. मात्र, तरीही अद्याप त्याची राष्ट्रीय संघात निवड झालेली नाही. ज्याची सर्व चाहते वाट पाहत आहेत. इशानने अलीकडच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे बीसीसीआयने त्याला छोटी संधी दिली आहे.
‘या’ खेळाडूंना वरिष्ठ संघात सामील होण्याची संधी…
भारत-अ संघात अशा काही खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांना वरिष्ठ भारतीय संघातही स्थान मिळण्याची संधी आहे. त्या खेळाडूंमध्ये अभिमन्यु ईश्वरन , ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी या खेळाडूंचा समावेश आहे. वास्तविक, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिले दोन कसोटी सामने खेळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला बॅकअप ओपनरची गरज आहे. जे अभिमन्यू ईश्वरन आणि ऋतुराज गायकवाड पूर्ण करू शकतात. अशा परिस्थितीत या खेळाडूंना वरिष्ठ संघात सामील होण्याची चांगली संधी आहे.
🚨 NEWS 🚨
Ruturaj Gaikwad to lead India A for tour of Australia.
Squad details 🔽 #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 21, 2024
सामन्यांचं वेळापत्रक –
भारत-अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया-अ, 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, मॅके
भारत-अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया-अ, 7 ते 10 नोव्हेंबर, मेलबर्न
भारत-अ विरुद्ध भारतीय वरिष्ठ संघ, 15 ते 17 नोव्हेंबर, पर्थ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय ‘अ’ संघ पुढीलप्रमाणे – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियान.





