Stock Market: निवडक खरेदीमुळे निर्देशांकांत सुधारणा

मुंबई – गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजार निर्देशांक कोसळल्यामुळे बऱ्याच कंपन्यांचे शेअर कमी किमतीवर उपलब्ध आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी सध्याच्या अस्थिर परिस्थितीतही बरीच खरेदी केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांत आज सुधारणा झाल्याचे दिसून आले.
रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, टाटा स्टील, विप्रो, टायटन, टेक महिंद्रा, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र पावर ग्रिड, ऍक्सिस बॅंक, बजाज फायनान्स, स्टेट बॅंकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 497 अंकांनी म्हणजे 0.89 टक्क्यांनी वाढवून 56,319 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 156 अंकांनी वाढून 16,770 अंकांवर बंद झाला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 3,565 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली.
कॅपिटलव्हाया ग्लोबल रिसर्च या संस्थेचे संशोधन प्रमुख गौरव गर्ग यांनी सांगितले की, बऱ्याच कंपन्यांचे शेयर कमी किमतीत उपलब्ध असतानाच निर्यात वाढणार असल्याचा दावा वाणिज्य मंत्रालयाने केला आहे. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते.
मात्र जोपर्यंत ओमायक्रॉनची परिस्थिती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत शेअर बाजारात अस्थिरता रेंगाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अमेरिकेतील व्याजदर वाढणार असल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक कमी करीत राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
तेजी- मंदीचा अंदाज
मोतीलाल ओसवाल फायनान्शीयल सर्व्हीसेसचे उपाध्यक्ष तपन तापडीया यांनी सांगितले की, गेल्या सहा सत्रात निफ्टीची बरीची हानी झाल्यामुळे बेअरीश कॅंडल तयार झाली आहे. एकूण परिस्थिती पाहता निफ्टी काही काळ तरी 16,800 अंकांखाली रेंगाळण्याची शक्यता आहे. 16,400 वर निफ्टीला तांत्रीक दृष्ट्या चांगला आधार आहे. जर खरेदी वाढली तर निफ्टी 17,000 अंकांपर्यंत वाढू शकतो. मुंबई शेअर बाजारातील मोठ्या 500 कंपन्यापैकी 27 कंपन्यांच्या शेअरचे भाव सध्या 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे निवडक खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.


