Inder Singh Parmar। मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी एक विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी, “राजा राम मोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट होते “,असे खळबळजनक विधान केले आहे. बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या उत्सवात बोलत असताना राजा राम मोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट असल्याचे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानावर सर्व स्तरातुन टीका करण्यात येत आहे. काय म्हणाले इंदर सिंह परमार? बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा उत्सवात बोलताना परमार यांनी, “राजा राम मोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते. त्यांनी देशाचे दलाल म्हणून काम केलं. एवढंच नाही तर त्यांनी धर्मांतरासारख्या गोष्टी आपल्या देशात सुरु केल्या. राजा राम मोहन रॉय यांना रोखण्याचं धाडस जर कुणी दाखवलं असेल तर ते बिरसा मुंडा होते. ब्रिटिशांच्या काळात मिशनरी शाळा होत्या. त्या शाळांच्या माध्यमातून धर्मांतरण चालत असे. शिक्षणाच्या नावाखाली मुलांचं धर्मांतरण केलं जाई. बिरसा मुंडा यांनी ही गोष्ट वेळीच ओळखली आणि आपल्या समाजासाठी ब्रिटिशांच्या विरोधात जाण्याची हिंमत दाखवली.” असे धक्कादायक विधान केले. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बिरसा मुंडा यांना शिकायचं होतं-परमार परमार एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी पुढे, “बिरसा मुंडा यांना शिक्षण घ्यायचं होतं. मात्र त्यावेळी फक्त मिशनरी शाळाच होत्या. तिथे शिक्षण घेताना त्यांना ही जाणीव झाली की ब्रिटिशांकडून शिक्षणाच्या आडून धर्मांतरण सुरु आहे. त्यामुळे बिरसा मुंडा यांनी ती मिशनरी शाळा सोडून दिली. त्यानंतर त्यांनी त्यांचं आयुष्य समाज सेवेसाठी व्यतित केलं आणि ब्रिटिशांचं शासन कसं संपेल यासाठी लढा दिला.” असे म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावर आता काँग्रेसनेही जोरदार टीका केली. परमार यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आणि लज्जास्पद- काँग्रेस काँग्रेस पक्षाने परमार यांनी राजा राम मोहन रॉय यांच्याबाबत जे विधान केलं त्यावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. परमार यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आणि लज्जास्पद आहे. काँग्रेसचे प्रवक्ते भुपेंद्र गुप्ता म्हणाले, राजा राम मोहन रॉय हे समाज सुधारक होते. सतीची प्रथा बंद करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ही ब्रिटिशांची दलाली होती का? जे त्या काळात इंग्रजांचे दलाल होते आज तेच राजा राम मोहन रॉय यांच्यावर टीका करत आहेत. भाजपाचे प्रवक्ते शिवम शुक्ला काय म्हणाले? या सगळ्या वादाला तोंड फुटलेलं असताना भाजपाने परमार यांची राजा राम मोहन रॉय यांच्याबाबत केलेलं विधान हे त्यांचे व्यक्तिगत विचार आहेत. पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही असं प्रवक्ते शिवम शुक्ला यांनी म्हटलं आहे. भाजपाने कायमच देशासाठी योगदान देणाऱ्या समाज सुधारकांचा सन्मान केला आहे. काँग्रेसने परमार यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे, असंही शुक्ला यांनी म्हटलं आहे