नारायणगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यात लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. नारायणगाव येथे शुक्रवारी (दि. २८ ) सायंकाळी साडे चार वाजता शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे, ठाकरे गटाचे नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके आदी सह लोकसभा मतदार संघातील विविध पक्षातील ४०० कार्यकर्ते, पदाधिकारी यांचेसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे विशेष करून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबतची माहिती स्वतः शरद सोनवणे यांनी दिली आहे. ते नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याबाबत बोलताना आमदार सोनवणे म्हणाले की, येत्या शुक्रवारी नारायणगाव येथे पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असून, येथे आयोजित मेळाव्यात पक्षप्रवेश होणार आहे. नारायणगाव येथील पूर्व वेशीजवळ त्यांची जाहीर सभा होणार आहे. या वेळी पुणे जिल्ह्यातून अनेकांचे प्रवेश शिवसेना पक्षात होणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यात युती न करता स्वतंत्र्यरित्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढविणार असल्याची माहिती देखील आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी दिली. असे असेल कार्यक्रमाचे स्वरूप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने २८ फेबुवारीला जुन्नर येथे येणार आहेत. नंतर गोद्रे येथील जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा उभारणी कामाला भेट देतील. नंतर चाळकवाडी येथील आमदार सोनवणे यांच्या राजगड येथे कार्यालयाला भेट देऊन नारायणगाव येथील शिवसैनिकाच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात शिरूर मतदार संघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालूक्यातील ४०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली आहे.