Independence Day : स्वातंत्र्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध कोणाच्या नेतृत्त्वाखाली वसूल केला होता पहिला ‘लगान’?

Independence Day special : भारतीय क्रिकेट संघाने 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. मात्र, पहिल्या कसोटी विजयासाठी भारताला 20 वर्षे वाट पाहावी लागली. 1952 मध्ये चेन्नई येथे इंग्लंडला हरवून भारताने पहिला कसोटी विजय मिळवला. परदेशात पहिला विजय 1968 मध्ये मन्सूर अली खान पटौदी यांच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्ध मिळाला. पण इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर हरवण्याचा पराक्रम अजीत वाडेकर यांच्या नेतृत्वात 1971 मध्ये साध्य झाला.
भारताला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य –
1971 मध्ये भारताने इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. पहिले दोन सामने अनिर्णित राहिले. तिसऱ्या कसोटीत भारताने ‘द ओव्हल’ मैदानावर 4 गडी राखून विजय मिळवला आणि मालिका जिंकली. इंग्लंडने पहिल्या डावात 355 धावा केल्या. भारताचा पहिला डाव 284 धावांवर संपला. भागवत चंद्रशेखर यांच्या 6 बळींच्या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव 101 धावांवर संपुष्टात आला. भारताला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य मिळाले.
अजीत वाडेकर (45), दिलीप सरदेसाई (40), गुंडप्पा विश्वनाथ (33) आणि फारुख इंजिनिअर (28) यांच्या खेळीच्या बळावर भारताने 4 गडी राखून सामना जिंकला. यापूर्वी भारताने इंग्लंडमध्ये 21 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 14 गमावले आणि 7 अनिर्णित राहिले. या मालिकेत वाडेकर यांनी 204 धावा केल्या. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणारे भारताचे फक्त तीन कर्णधार आहेत: अजीत वाडेकर, कपिल देव आणि राहुल द्रविड.
अजीत वाडेकरांची कारकीर्द –
वाडेकर यांनी 16 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यात 4 विजय, 4 पराभव आणि 8 सामने अनिर्णित राहिले. 1 एप्रिल 1941 रोजी मुंबईत जन्मलेल्या वाडेकर यांनी 1966 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी भारतासाठी कसोटी पदार्पण केले. ते टॉप ऑर्डरचे फलंदाज आणि डावखुरे फिरकी गोलंदाज होते. वाडेकर यांनी 37 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतक, 14 अर्धशतके आणि 2,113 धावा केल्या. दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 1 अर्धशतकासह 73 धावा केल्या. जुलै 1974 मध्ये त्यांनी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
हेही वाचा – Akash Deep : आशिया कपआधी भारतीय संघाला मोठा धक्का! आकाशदीप दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीतून बाहेर
अजीत वाडेकर यांचे 15 ऑगस्ट 2018 रोजी निधन –
भारत सरकारने त्यांना 1967 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 1972 मध्ये पद्मश्रीने सन्मानित केले. तसेच, त्यांना सी.के. नायडू पुरस्कारानेही गौरवण्यात आले. वाडेकर हे खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशी विविध भूमिका निभावणारे मोजके क्रिकेटपटूंपैकी एक होते. याशिवाय राहुल द्रविड, लाला अमरनाथ आणि चंदू बोर्डे यांनीच ही कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या भूमीवर भारताला पहिला कसोटी मालिका विजय मिळवून देणाऱ्या अजीत वाडेकर यांचे 15 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले.





