Indapur : मतदानात इंदापूरचा राजकीय ‘पॉवर शो’
Indapur : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी इंदापूर तालुक्यात बावडा, भिगवण, इंदापूर शहर, निमगाव केतकी आणि सणसर या पाच केंद्रांवरील १६ बूथवर मतदान झाले. एकूण ८ हजार ६९५ मतदारांपैकी ५ हजार ८४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ६७.२५ टक्के मतदानाची नोंद झाली.

इंदापूर : पुणे पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यात मतदानाचा उत्साह दिसून आला. पदवीधर मतदारसंघात ६७.२५ टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ९१.०० टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघातून इंदापूर तालुक्यातील अपक्ष उमेदवार लक्ष्मण हरणावळ निवडणूक रिंगणात उतरल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले होते. विविध राजकीय पक्षांनी लावलेली ताकद, पदवीधर मतदारांची नोंदणी आणि स्थानिक पातळीवरील राजकीय प्रतिष्ठेमुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी इंदापूर तालुक्यात बावडा, भिगवण, इंदापूर शहर, निमगाव केतकी आणि सणसर या पाच केंद्रांवरील १६ बूथवर मतदान झाले. एकूण ८ हजार ६९५ मतदारांपैकी ५ हजार ८४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ६७.२५ टक्के मतदानाची नोंद झाली. केंद्रनिहाय आकडेवारीनुसार बावडा येथे सर्वाधिक ७१.२० टक्के, भिगवण येथे ७०.६९ टक्के, इंदापूर शहरात ६७.२७ टक्के, निमगाव केतकी येथे ६६.८८ टक्के, तर सणसर येथे ६१.५० टक्के मतदान झाले. बावडा केंद्राने मतदानाच्या टक्केवारीत आघाडी घेतली, तर सणसर येथे तुलनेने कमी मतदान झाले.
शिक्षक मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मिळाला असून, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी इंदापूर तालुक्यातील पाच केंद्रांवर एकूण १,११६ मतदारांपैकी १,०१६ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात ९१.०० टक्के मतदान झाले. बावडा येथे ९५.८१ टक्के मतदानाची नोंद झाली. निमगाव केतकी येथे ९३.१४ टक्के, सणसर येथे ९०.३१ टक्के, इंदापूर येथे ८९.६३ टक्के, तर भिगवण येथे ८८.०३ टक्के मतदान झाले. शिक्षक मतदारांचा मोठा सहभाग या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरला.
इंदापूर तालुक्यातील अपक्ष उमेदवार लक्ष्मण हरणावळ यांच्या गुरुकुल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यामुळे यापूर्वी मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या अनेक पदवीधरांना यंदा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यातील उमेदवार, स्थानिक पातळीवरील राजकीय ताकद आणि पदवीधर मतदारांची वाढलेली नोंदणी यामुळे इंदापूरच्या मतदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
इंदापूरचा अपक्ष उमेदवार चर्चेत; राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला
पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील अपक्ष उमेदवार लक्ष्मण हरणावळ यांनी इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक चार येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. इंदापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच याच तालुक्यातील अपक्ष उमेदवार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. हरणावळ यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यातील विविध राजकीय पक्षांनीही प्रचार आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ताकद लावल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पदवीधरांच्या मतदानाकडे केवळ निवडणूक म्हणून नव्हे, तर तालुक्याच्या राजकीय प्रभावाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.





