इंदापूरची जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग संस्था आषाढी वारीत वारकऱ्यांची करणार चरण सेवा

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग संस्था यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांची चरण सेवा करणार आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या समन्वयाने ही संधी प्रदान करण्यात आली असून, याबाबतचे लेखी पत्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक यांनी संस्थेचे संस्थापक जयवंत नायकुडे यांना दिले आहे.
जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक जाणिवेतून उपेक्षित घटकांसाठी कार्यरत आहे. दरवर्षी ही संस्था आपल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसह वारकऱ्यांची मनोभावे चरण सेवा करते. यंदा शासनाने या कार्याची दखल घेत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वाखरी येथे वारकऱ्यांची चरण सेवा करण्याची जबाबदारी संस्थेला दिली आहे. ही संधी इंदापूर तालुक्यासाठी प्रथमच मिळाली आहे.
संस्थापक जयवंत नायकुडे यांनी सांगितले, “शासनाने दिलेल्या या संधीचे आम्ही मनापासून स्वागत करतो. वारकऱ्यांची चरण सेवा योग्य रीतीने आणि मनोभावे केली जाईल. चरण सेवेसह जनजागृती आणि चिकित्सा सेवा राबवली जाईल. कोणत्याही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.” आषाढी वारीच्या या पवित्र सोहळ्यात चरण सेवा मिळणे हा संस्थेसाठी सन्मान आहे.





