इंदापूर : शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाने ही जबाबदारी स्वीकारत शहरातील विविध भागांत पिंजरे लावून श्वानांना पकडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. यासंदर्भात पालिकेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन नगराध्यक्ष भरत शहा व सर्व नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. नगराध्यक्ष भरत शहा व सर्व नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी व संबंधित विभाग समन्वयाने कार्यरत असून, भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण व सुरक्षित पुनर्वसन या सर्व प्रक्रिया शासन नियम व प्राणी संरक्षण कायद्याच्या चौकटीत पार पाडल्या जात आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि शहरातील सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे सुरू असून, शहराला सुरक्षित व सुव्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. कायद्याच्या चौकटीत कार्यवाही या मोहिमेअंतर्गत जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरासह शहरातील विविध भागात मुक्तपणे संचार करणाऱ्या कुत्र्यांना जेरबंद करण्यात येत आहे. ही प्रक्रिया राबवताना ‘प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा’ आणि ‘प्राणी जन्म नियंत्रण’ (Animal Birth Control) नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. पकडलेल्या श्वानांना कोणतीही इजा न होता त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असल्याची माहिती नगरपरिषदेने दिली. नगरपरिषद ही शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यास बांधील आहे. भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार आणि प्राणी संरक्षण कायद्यांचे पालन करत ही मोहीम राबविण्यात येत आहे. पकडलेल्या कुत्र्यांना कोणतीही इजा न होता त्यांचे लसीकरण, निर्बिजीकरण व नियमानुसार पुनर्वसन करण्याची प्रक्रिया केली जात आहे. – रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर नगरपरिषद