पुणे जिल्हा | दिवाळीच्या फराळाला महागाईचा चटका

इंदापूर, (प्रतिनिधी) – दिवाळी सणाच्या तोंडावर महागाईने डोके वर काढले आहे, तर दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार घराच्या दारापर्यंत पोहोचला आहे. त्यातच सध्या बाजारात खाद्यतेल, डाळी, तांदूळ, लहान मुले यांच्या कपड्याच्या किमती, घरात लागणार्या महत्त्वाच्या उपयोगी वस्तू, सुकामेवा महागला आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
गत महिनाभरात खाद्य तेलाचे दर 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर शेतकर्यांवर नागरिकांवर पडलेला दिसतो, त्यामुळे यंदा दिवाळीच्या फराळाला जोरदार महागाईचा चटका बसला आहे.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून घरोघरी स्वच्छता, तयारीला सुरूवात झाली आहे. त्याच बरोबर खरेदीसाठी इंदापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. तालुक्यातील निमगाव केतकी, बावडा, भिगवण, वालचंदनगर, बाजारात देखील गर्दी वाढू लागली आहे. मात्र गर्दी बरोबरच महागाई देखील वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
इंदापूर तालुका हा ग्रामीण भागाचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकरी, नागरिक प्रत्येक कुटुंबात, वर्ष भरातील सर्वात मोठ्या या सणाला घरोघरी फराळाची रेलचेल असते. शिवाय नवीन कपडे, नवीन वाहने, दागिने खरेदीकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे बाजारपेठेला उभारी मिळते.
यावर्षी महागाईमुळे त्यावर काही अंशी परिणाम देखील होत आहे. महागाईच्या ओझ्याखाली सर्वसामान्य नागरिक दबला जात आहे. जेमतेम उत्पन्न असणार्या कुटुंबाला आर्थिक जुळवाजुळव करताना, तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच काही देशामधील युध्दाची परिस्थिती महागाईसाठी कारणीभूत ठरत व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे.
त्यातच सरकारकडून विविध वस्तूवर आकारल्या जाणार्या जीएसटी दरात वाढ केली जात असल्याने, महागाई वाढत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे. डाळी, खाद्यतेल, तांदूळ, सुकामेवा व अन्य खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. त्यामुळे काटकसर किती करायची असा प्रश्न गृहिणीसमोर पडला आहे.
रेशन दुकानातून दिला जाणारा आनंदाचा शिधा दुप्पट दिला तर दिवाळी गोड होऊ शकते असे महिला बोलताना दिसून येत आहेत. मात्र यावेळी आचारसंहितेमुळे हा आनंदाचा शिधा मिळेल की नाही ही हमी नाही. खरिपाचा हंगाम आल्यानंतर वस्तूच्या किमतीत सुधारणा होऊ शकते. पण अजूनही म्हणावा तसा प्रमाणात मालाची आवक झालेली नाही.
बाजारपेठेत उमेदवारांचा प्रचार
इंदापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील आठवडे बाजारात गावच्या मुख्य बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. याचा फायदा घेत गाव पुढारी, कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत.
एकतर महागाईने नागरिक बेजार झाले आहेत. त्यातच शेतातील कामे खरेदी करण्याचा वेळ, हे गणित जुळत नाही. त्यातच अधिक भर म्हणून मतदान करा, द्या की, हो मत ! लक्ष ठेवा, आम्ही विसरणार नाही. असे शब्द नकळत तोंडातून पडताना दिसत आहेत.





