Indapur News: ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका बंद होणार? निमगाव केतकीत संतापाचा भडका
Indapur News: ऐतिहासिक व सामाजिक मालिकांना सरकारने विशेष अर्थसाह्य देण्याची मागणी; इंदापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवणार.

Indapur News – सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेली आणि सामाजिक प्रबोधन करणारी ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही ऐतिहासिक मालिका टीआरपी कमी असल्याच्या कारणावरून बंद होणार आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ निमगाव केतकी येथील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत ही मालिका सुरू ठेवण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा आणि शासन दरबारी दाद मागण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या संदर्भात आयोजित बैठकीत आप्पा करे म्हणाले, “ही मालिका केवळ मनोरंजन नसून समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे टीआरपी कमी असल्याचे तांत्रिक कारण देऊन ती बंद करणे अत्यंत अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आजही काही घटकांकडून विरोध होताना दिसतो, अशा काळात या विचारांचे जतन करणाऱ्या मालिका सुरू राहणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मच्छिंद्र चांदणे यांनी सांगितले, खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ऐतिहासिक विषयांवर केलेल्या कार्याप्रमाणेच या मालिकेतूनही खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. संतोष राजगुरू यांनी सरकारने अशा सामाजिक व ऐतिहासिक मालिकांना विशेष अर्थसाह्य देण्याची मागणी केली.
या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका बंद होऊ नये यासाठी संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी देवराज जाधव, अंकुश जाधव, सुभाष भोंग, सचिन राऊत, मच्छिंद्र चांदणे, संतोष राजगुरू, अतुल मिसाळ, सुभाष बोराटे, गणेश शेळके, दादाराम शेंडे, अनंत गटकुल यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.





