इंदापूर : पर्यावरण जपणूक आणि मानवी जीवनाचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्ष लागवडीइतकेच त्यांचे संगोपनही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शहा परिवाराचे प्रमुख मुकुंद शहा यांनी केले. इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूलमध्ये 1 जुलै रोजी वन महोत्सव आणि डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशालीताई शहा, डॉ. संजय शहा, डॉ. चिंतामण पाटील, डॉ. यतीन शिंदे, श्रीमती प्रतिमा शहा, डॉ. बिचकुळे यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व सांगणारे फलक हातात घेऊन रॅली काढली. संस्थेचे विश्वस्त अंगद शहा आणि रुचिरा शहा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. क्षितिजा शहा यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य आणि पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची झाडे लावली आणि परिसरातील वृक्षांची काळजी घेण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थी सोहम होळकुंदे याने वन महोत्सवाविषयी मनोगत व्यक्त केले, तर नंदिनी रणदिवे आणि स्वराली शेंडे यांनी वनविषयक कविता सादर केल्या. शिक्षिका रितू शुक्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कार्तिकी पाटील यांनी आभार मानले. “शहा ग्लोबल स्कूलमध्ये सात दिवसांचा वन महोत्सव सप्ताह” शहा ग्लोबल स्कूलमध्ये 1 ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव सप्ताह साजरा होणार आहे. या कालावधीत प्रत्येक वर्गाकडून वृक्ष आणि वनांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारे विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त अंगद शहा यांनी दिली.