Indapur News : सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर (Indapur News) तालुक्यातील डाळज नं. २ परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत इको गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील वाहतूक काही वेळ बंद राहिली. अपघातग्रस्त मारुती सुझुकी इको (क्र. MH 12 XE 8816) मध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. मृत झालेल्यांमध्ये आदिती अमर हातेकर (वय २५), सखुबाई ईश्वर गेजगे (वय ६०) आणि जय अमर हातेकर (वय २, सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. इकोचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय ५०, रा. पाटस) हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वाती कबीरदास गेजगे (वय ३४) आणि समृद्धी कबीरदास गेजगे (वय १० महिने, दोघी रा. पाटस) या किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, सोलापूर–पुणे लेनवरून पुण्याकडे निघालेल्या आयशर टेम्पो (क्र. MH 13 CU 5163) चा टायर अचानक पंक्चर झाला. चालकाने टेम्पो महामार्गाच्या कडेला अर्धवट आणि धोकादायक स्थितीत उभा केला. याचवेळी मागून येणाऱ्या इको गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि इकोने उभ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेमुळे इकोचे मोठे नुकसान झाले असून, प्रवाशांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महामार्गावरील अशा अपघातांमध्ये वाहनांच्या अनुचित पार्किंगमुळे आणि वेगामुळे जीवितहानी होत असल्याने, वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी आणि आपत्कालीन परिस्थितीत ट्रॅफिक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दुर्दैवी घटनेने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.