Indapur News : श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या समाधीवरील अतिक्रमणाविरोधात रास्ता रोको आंदोलन

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावरील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात गुरुवार, २४ एप्रिल रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गलांडवाडी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन झाले. तालुक्यातील हजारो नागरिकांनी या आंदोलनाला उस्फूर्त पाठिंबा देत, वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या समाधीवरील जिहादी अतिक्रमणाचा तीव्र निषेध व्यक्त केला.
या आंदोलनामुळे पुणे-सोलापूर-बेंगळुरू महामार्गावर सुमारे ४ तास वाहतूक ठप्प झाली. हिंदू स्वाभिमान आणि ऐतिहासिक वारशाच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहण्याची गरज या आंदोलनाने अधोरेखित केली. प्रशासनाने अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी करत मालोजीराजे यांच्या पवित्र स्मारकावर कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमण त्वरित हटवले जाईल आणि मालोजीराजे यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारले जाईल, असे आश्वासन दिले.





