Indapur News – इंदापूर पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धूळ चारत सर्वच्या सर्व १६ जागांवर घवघवीत विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता सभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य लागले आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या या पदासाठी लासुर्णे गणातील हर्षवर्धन मधुकर लोंढे, वालचंदनगर गणातून अनिता नंदकुमार सोनवणे आणि सणसर गणातील ज्योत्स्ना मोहन सुरुडकर यांच्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीने या निवडणुकीत भाजपविरुद्ध दुरंगी लढतीत ताकद दाखवत पंचायत समितीवर पहिल्यांदाच एकहाती सत्ता प्रस्थापित केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार ‘घड्याळ’ चिन्हावर उभे राहिले आणि १६ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडवला. दरम्यान, तालुक्यातील आरक्षण रचनेनुसार वालचंदनगर, सणसर हे दोन्ही गण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. लासुर्णे-अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे समीकरणे अधिकच रंगतदार बनली आहेत. माजी पंचायत समिती सभापती नंदकुमार सोनवणे यांच्या पत्नी अनिता सोनवणे या स्पर्धेत असल्याने त्यांच्या कुटुंबातील अनुभव हा निर्णायक ठरू शकतो, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोंढे, सोनवणे आणि सुरुडकर या तिघांपैकी नेमका कोणाला पक्षश्रेष्ठींचा कौल मिळतो, उपसभापतीपदाची लॉटरी कोणाला लागते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेनंतर इंदापूर पंचायत समिती सत्ताकारणाला आता नवा चेहरा मिळणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.