इंदापूर : ‘भारताचे जलपुरुष’ म्हणून ख्यातनाम असलेले पर्यावरण कार्यकर्ते आणि जलसंरक्षण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी इंदापूर शहरातील उजनी धरणाच्या दूषित पाण्याच्या समस्येकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत ते लवकरच इंदापूरला भेट देणार असून, पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पाहणी करणार आहेत, अशी माहिती समितीचे प्रमुख आणि माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे यांनी पत्रकारांना दिली. प्रा. ताटे यांनी सांगितले की, उजनी धरणाच्या वरच्या भागातून येणाऱ्या पाण्यात पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील मलमूत्र आणि विविध कंपन्यांमधून निघणारा घातक रासायनिक कचरा मिसळतो. यामुळे पाणी दूषित होऊन त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. पुणे, सोलापूर आणि पंढरपूर परिसरातील अनेक गावांना हे दूषित पाणी पिण्यासाठी नाईलाजाने वापरावे लागते. इंदापूर नगरपरिषदेने 2018 मध्ये तरंगवाडी तलावावरील दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद केल्या असून, सध्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून आधुनिक शुद्धीकरण यंत्रणेद्वारे पाणी पुरवले जाते. तरीही, इंदापूरकरांना दूषित पाणीच प्यावे लागत आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावल्यानंतर पाणलोट क्षेत्रात विविध पाणवनस्पती उगवतात. पाण्याची पातळी वाढल्यानंतर या वनस्पती पाण्याखाली जाऊन कुजतात, ज्यामुळे पाण्यात दुर्गंधी येते आणि पाण्याचा रंग बदलतो. शुद्धीकरणानंतरही ही समस्या कायम राहते. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या भिगवण दौऱ्यादरम्यान प्रा. ताटे यांच्यासह समितीचे प्रमुख कार्यकर्ते महादेव चव्हाण, हमीद आतार, संदीपान कडवळे आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन ही समस्या सविस्तर मांडली. डॉ. सिंह यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने हा प्रश्न सोडवण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे, असे प्रा. ताटे यांनी स्पष्ट केले.