Indapur News : पहलगाम हल्ल्यानंतर भारत एकाकी, मोदींचे धोरण अपयशी : ॲड. राहुल मखरे

इंदापूर : पहलगाम हल्ल्यानंतर भारताला कोणत्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही. पूर्वी बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका भारताचे मित्रराष्ट्र होते, परंतु सध्याच्या नेतृत्वाच्या दिखाऊ धोरणांमुळे हे देश चीनकडे झुकले आहेत. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते ॲड. राहुल मखरे यांनी केली.
इंदापूर रेस्ट हाऊस येथे दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित कार्यकर्ता बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. मखरे बोलत होते. यावेळी सुखदेव चव्हाण, बाबासाहेब भोंग, महेश लोंढे, राहुल शिंगाडे, विकास भोसले, सूरज धाईंजे, नानासाहेब चव्हाण, ॲड. सूरज मखरे, बलभीम महाराज राऊत, नागेश भोसले, दया मखरे, आझाद सय्यद, अल्ताफ मोमीन, इम्रान बागवान, दादा आदलिंग आणि दादा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. मखरे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या आदेशांचे पालन करून काम करावे. पक्षश्रेष्ठींना तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करताना कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी कटिबद्ध राहावे. तुमच्या कामाची दखल घेऊन भविष्यात योग्य संधी दिली जाईल, असे आश्वासनही मखरे यांनी कार्यकर्त्यांना दिले.





