इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला शासनाची मान्यता मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन्माननीय श्रीमंत ढोले यांनी या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू होणाऱ्या या महाविद्यालयाला ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र यांची मान्यता मिळाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून चार अभ्यासक्रम सुरू होणार असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग (AI & ML), सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (ENTC) आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या प्रत्येक शाखेत ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेस मंजुरी देण्यात आली आहे. या महाविद्यालयामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होणार असून, पालकांचे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे स्वप्न साकार होईल. श्रीमंत ढोले यांनी सांगितले की, लाखेवाडीत मोठ्या शहरांप्रमाणे सर्व भौतिक सुविधा आणि तज्ञ प्राध्यापकांद्वारे दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात नवीन अभ्यासक्रम सुरू करून लाखेवाडीला शैक्षणिक हब बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. संस्थेने विविध आंतरराष्ट्रीय आणि व्यावसायिक कंपन्यांशी प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधींसाठी सामंजस्य करार केले आहेत. यावेळी श्रीमंत ढोले यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, मुख्य सल्लागार प्रदीपजी गुरव, सचिव हर्षवर्धन खाडे, सहसचिवा पौर्णिमा खाडे, विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषीकेश डोले, प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर, गणेश पवार, राजेंद्र सरगर यांच्यासह सर्व विश्वस्त, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.