इंदापूर: महात्मा फुले संघाने फोडली भरत शहा मित्र परिवाराची दहीहंडी

इंदापूर : इंदापूर शहरात भरतशेठ शहा मित्र परिवारातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाला हजारो गोविंदांनी आणि तालुक्यातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत “गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला” अशी साद घातली. शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.
सोमवार, दि. १८ ऑगस्ट रोजी जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला. इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा आणि मित्र परिवाराने उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंदशेठ शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी उपनगराध्यक्ष अरविंदतात्या वाघ, अंगद शहा, अतुल झगडे, धरमचंद लोढा, किरण गाणबोटे, नानासाहेब शेंडे, प्रशांत उंबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महात्मा फुले दहीहंडी संघाला दहीहंडी फोडल्याबद्दल सन्मानचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सात थर लावत महात्मा फुले संघाने मारली बाजी –
या सोहळ्यात इंदापूर शहरातील सहा गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. अथक प्रयत्नांनंतर महात्मा फुले दहीहंडी संघाने सात थर लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. सहभागी पथकांमध्ये महात्मा फुले दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ, स्वराज्य दहीहंडी संघ (शिरसोडी), न्यू व्यंकटेश दहीहंडी संघ, मालोजीराजे दहीहंडी संघ आणि शिवशंभो दहीहंडी संघ यांचा समावेश होता. प्रत्येक पथकाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले, तर विजेत्या पथकाला रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.
हास्यजत्रा आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम –
दहीहंडी सोहळ्यापूर्वी भरत शहा मित्र परिवारातर्फे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर, रोहित माने, वनिता खरात, नम्रता संभेराव यांच्या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. तसेच प्रसिद्ध सिनेस्टार आणि नृत्यांगना मीरा जोशी यांच्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. इंदापूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी, विशेषत: महिला भगिनींनी या कार्यक्रमांना भरभरून दाद दिली.
विशेष व्यवस्था आणि आकर्षक सजावट
या उत्सवात मुली आणि महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. दहीहंडी आणि गोविंदांच्या सुरक्षेसाठी दोन स्वतंत्र क्रेन लावण्यात आल्या होत्या. मान्यवरांसाठी खास व्यासपीठ, तसेच कलाकार आणि बक्षीस वितरणासाठी स्वतंत्र मंच उभारण्यात आला होता. आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावटीने दहीहंडी सोहळ्याला विशेष रंगत आली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





