Indapur Budget 2026 : इंदापूरकरांना लॉटरी! १७८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पाहा काय स्वस्त, काय महाग?
Indapur Budget 2026 : इंदापूर नगरपरिषदेचा आर्थिक वर्ष २०२६-२७ चा १७८ कोटींचा अर्थसंकल्प कोणतीही करवाढ न करता सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

Indapur Budget 2026 – शहराच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासाचा मार्ग मोकळा करणारा इंदापूर नगरपरिषदेचा आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि.२७) छत्रपती शिवाजीराजे सभागृहात झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत सर्वानुमते मंजूर झाला. कोणतीही करवाढ न करता विकासाला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प नगरपरिषदेच्या कामकाजाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नगराध्यक्ष भरत शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपनगराध्यक्ष शैलेश पवार, विरोधी पक्षनेते अनिल पवार, सर्व नगरसेवक तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष शहा म्हणाले, इंदापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प तयार केला आहे.
नागरिकांवर नवा करभार न टाकता अधिक सुविधा देणे हा आमचा मुख्य हेतू आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत भुयारी गटार योजना आणि रस्ते प्रकल्पांच्या स्वहिस्स्यासाठी आम्ही भरीव तरतूद केली आहे. सामाजिक बांधिलकी जपत महिला-बालकल्याण, दिव्यांग,
दुर्बल घटक तसेच क्रीडा क्षेत्रासाठीही स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. पारदर्शक आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे इंदापूरचा विकास पुणे जिल्ह्यात ठळकपणे दिसेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेत अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करून सदस्यांनी तो एकमताने मंजूर केला.

इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात २०२६-२७ चा विकासाभिमुख अर्थसंकल्प मंजूर करताना सदस्य.
“अपेक्षित उत्पन्न स्रोतांचा वास्तववादी अंदाज घेऊन आणि शहर विकास आराखड्याशी सुसंगत प्राधान्यक्रम ठरवून हा संतुलित अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, संगणकीकरण, नागरी सुविधा केंद्राचे आधुनिकीकरण आणि नवीन प्रशासकीय इमारत उभारणीमुळे प्रशासन अधिक कार्यक्षम होईल. नियोजनबद्ध आर्थिक व्यवस्थापनामुळे आगामी काळात इंदापूर नगरपरिषदेची विकासगती अधिक वेगवान होईल.”
– रमेश ढगे, मुख्याधिकारी





