Indapur : कापणीच्या उंबरठ्यावरची केळीची बाग वादळाने जमीनदोस्त
Indapur : शहाजीनगरातील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; तातडीच्या मदतीची मागणी

Indapur : इंदापूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला. शहाजीनगर (रेडा) येथील प्रगतशील बागायतदार राजाराम चव्हाण यांची कापणीसाठी पूर्णपणे तयार असलेली साडेपाच एकरांवरील केळीची बाग अवघ्या काही मिनिटांच्या वादळात जमीनदोस्त झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर कोसळली. कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेले पीक जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. केळीबागेसह चव्हाण यांच्या शेतातील सहा आंब्याची व सात नारळाची झाडेही उन्मळून पडली. तसेच पोल्ट्री शेडचा पत्रा एका बाजूने उचकटल्याने त्याचेही नुकसान झाले आहे.
केळी लागवडीसाठी खत, औषधे, मजुरी आणि सिंचनावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. मात्र, वादळामुळे ही संपूर्ण गुंतवणूक धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासन व कृषी विभागाने विशेष मदत जाहीर करावी, तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी होत आहे.





