Shai Hope Century : शाई होपचे सलग दुसरे शतक! बाबर आझम अन् जो रूटचा रेकॉर्ड मोडला; न्यू चंदीगडमध्ये विंडीज कर्णधाराचे तुफान
Shai Hope Century : वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा बाबर आझम आणि जो रूट यांचा विक्रम मोडला.

IND vs WI 3rd ODI Shai Hope Hits 21st Century Surpasses Babar Root : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा कर्णधार शाई होपने (Shai Hope) भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा तुफानी फलंदाजी करत शानदार शतक झळकावले आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाबाद १०४ धावांची खेळी केल्यानंतर होपने महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सलग दुसरे शतक ठोकले. अवघ्या १०४ चेंडूंत पूर्ण केलेले हे शतक त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील २१ वे शतक ठरले आहे. या शतकासह त्याने बाबर आझम आणि जो रूट (दोन्ही प्रत्येकी २० शतके) यांना मागे टाकले आहे.
भारताविरुद्ध ५ वे शतक; १० चौकार अन् एका षटकाराची आतषबाजी!
शाई होपने आपल्या खेळीत १० चौकार आणि एका उत्तुंग षटकारासह शतकाला गवसणी घातली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध २८ डावांमध्ये झळकावलेले हे त्याचे पाचवे शतक आहे. वनडे फॉरमॅटमध्ये भारताव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संघाविरुद्ध त्याने १००० पेक्षा जास्त धावा केलेल्या नाहीत. तसेच भारतीय भूमीवर ठोकलेले हे त्याचे ५ वे शतक ठरले असून, त्यातील चार भारताच्या तर एक २०१९ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आले होते.
अॅक्टिव्ह फलंदाजांमध्ये चौथ्या स्थानी; गेलनंतर विंडीजचा दुसरा फलंदाज!
ODI hundred No. 2️⃣1️⃣ for Shai Hope.
This is his fourth ton vs India in India, the joint-second most alongside Daryl Mitchell. AB de Villiers tops the list with five.#INDvWI pic.twitter.com/Ffzpu0WRMD
— Cricbuzz (@cricbuzz) October 3, 2026
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या बाबतीत होप आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्यापुढे विराट कोहली (५५), रोहित शर्मा (३५) आणि क्विंटन डिकॉक (२३) हे तीनच फलंदाज आहेत. वेस्ट इंडिजच्या इतिहासात ख्रिस गेलच्या (२५ शतके) नावावर सर्वाधिक शतकांचा विक्रम असून, त्याच्यानंतर २१ शतकांसह होप दुसऱ्या स्थानावर आहे.
सक्रिय खेळाडूंची सर्वाधिक शतके:
- विराट कोहली: ५५ शतके
- रोहित शर्मा: ३५ शतके
- क्विंटन डिकॉक: २३ शतके
- शाई होप: २१ शतके
- बाबर आझम / जो रूट: प्रत्येकी २० शतके
ज्वेल अँड्र्यूच्या दुखापतीमुळे सलामीला; सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा!
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत मध्यफळीत खेळणारा कर्णधार होप या लढतीत सलामीवीर म्हणून मैदानावर उतरला. क्षेत्ररक्षणादरम्यान ज्वेल अँड्र्यू जखमी झाल्यामुळे होपला डावाची सुरुवात करावी लागली. दुसऱ्या षटकात अंशुल कम्बोज आणि तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजला प्रत्येकी दोन-दोन चौकार ठोकत त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक इरादे स्पष्ट केले होते.





