IND VS UAE : कुलदीप – शिवमच्या भेदक गोलंदाजीवर UAE ची दाणादाण; भारताचा 9 विकेटने दणदणीत विजय

दुबई: आशिया चषक 2025 मधील पहिल्या सामन्यात भारताने संयुक्त अरब अमिराती (यूएई)चा 9 विकेटने धुव्वा उडवत दमदार विजय मिळवला. यूएईने ठेवलेले 58 धावांचे आव्हान भारताने अवघ्या 4.3 षटकांत पार केले. हा टी-20 सामना दोन्ही डाव मिळून 20 षटकांपर्यंतही टिकला नाही. यूएई 13.1 षटकांत 57 धावांत सर्वबाद झाले, तर भारताने 4.3 षटकांतच विजय मिळवला. एकूण 17.4 षटकांतच सामना संपला.
भारताची दमदार फलंदाजी
58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने 16 चेंडूत 30 धावा, तर शुभमन गिलने 9 चेंडूत नाबाद 20 धावांची खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने 2 चेंडूत नाबाद 7 धावा जोडल्या. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने अभिषेक शर्माची एकमेव विकेट घेतली.
भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व
या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो अचूक ठरला. भारतीय गोलंदाजांनी यूएईला 13.1 षटकांत 57 धावांत गुंडाळले. यूएईने 47 धावांवर तिसरी विकेट गमावली होती, त्यानंतर अवघ्या 10 धावांत त्यांच्या उरलेल्या 8 विकेट पडल्या. फिरकीपटू कुलदीप यादवने 2.1 षटकांत फक्त 7 धावा देत 4 विकेट घेतल्या, यापैकी 3 विकेट त्याने एकाच षटकात काढल्या. शिवम दुबेने 3 विकेट, तर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
यूएईची निराशाजनक कामगिरी
यूएईच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली होती. आलिशान शरफूने 22 आणि मोहम्मद वसीमने 19 धावा केल्या. मात्र, त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही, आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांचा डाव उद्ध्वस्त केला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत वर्चस्व राखले. कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले, तर अभिषेक आणि गिल यांच्या आक्रमक फलंदाजीने विजयाला ग्लॅमर जोडले. या विजयासह भारताने आशिया चषक 2025 मध्ये विजयी सलामी दिली आहे.





