IND vs SL : टीम इंडियामध्ये ‘हा’ खेळाडू घेणार पांड्याची जागा? BCCIने आतापासून सुरू केली तयारी…

IND vs SL, Shivam Dube & Hardik Pandya : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर वनडे मालिका खेळवली जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यासाठी संघ जाहीर केला आहे. शिवम दुबेलाही टीम इंडियात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे दुबे वनडे आणि टी-20 या दोन्ही संघांचा भाग आहे. निवड समिती हार्दिक पांड्याला पर्याय शोधत आहे आणि दुबे टीम इंडियाचा भावी स्टार बनू शकतो.
शिवम दुबेचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. अष्टपैलू म्हणूनही त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. याच कारणामुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. दुबे फिनिशरची भूमिकाही निभावू शकतो. तो टीम इंडियासाठी एक वनडे सामना खेळला आहे. त्याने आतापर्यंत 32 टी-20 सामनेही खेळले आहेत. या कालावधीत 435 धावा केल्या आहेत. दुबेने या फॉरमॅटमध्ये 3 अर्धशतके झळकावली आहेत. दुबेने गोलंदाजीतही प्रावीण्य दाखवले आहे. त्याने टी-20 सामन्यात भारताकडून 11 विकेट घेतल्या आहेत.
हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने अनेक प्रसंगी अष्टपैलू म्हणून दमदार कामगिरी केली आहे. पांड्याने टीम इंडियासाठी 86 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये 1 हजार 769 धावा केल्या आहेत. यासोबतच 84 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच पंड्याने 100 टी-20 सामन्यांमध्ये 1492 धावा केल्या असून 84 विकेट्स घेतल्या आहेत.
शिवम दुबे देखील टीम इंडियासोबत झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या काळात त्याने तीन टी-20 सामने खेळले. दुबेने एका सामन्यात 26 धावा देत 2 बळी घेतले होते. आता तो श्रीलंकेविरुद्धही मैदानात उतरू शकतो. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना 27 जुलैला आणि दुसरा टी-20 सामना 28 जुलैला खेळवला जाणार आहे. तिसरा सामना 30 जुलै रोजी होणार आहे.
कर्णधारपदाची संधी घेतली हिरावून…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी संध्याकाळी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी पांड्याला संघात स्थान दिले आहे. पण त्याला टी-20 चा कर्णधार बनवण्यात आले नाही. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता त्याच्या जागी पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात कर्णधारपदासाठी स्पर्धा होती. पण यामध्ये सूर्यानं बाजी मारली आणि त्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
Womens Asia Cup 2024 : आजपासून आशिया कपचा थरार, पहिल्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान…
दरम्यान, कर्णधारपदाच्या शर्यतीत अष्टपैलू हार्दिक पंड्या हा प्रबळ दावेदार होता. हार्दिकने गेली काही महिने रोहित-विराटच्या अनुपस्थितीत टी-20 टीमचं नेतृत्व केलं. विशेष बाब म्हणजे टी-20 विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी त्यानं पार पाडली. मात्र त्यानंतरही निवड समितीने हार्दिकऐवजी सूर्यकुमारवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदाची सूत्रं दिली. त्यामुळे हार्दिकवर अन्याय झाल्याचा सूर नेटकऱ्यांना सोशल मीडियावर आळवला आहे.
हार्दिक एकदिवसीय संघात उपकर्णधार होता. मात्र बीसीसीआयने इथेही त्याचे पंख छाटलेत. श्रीलंका दौऱ्यातील टी 20 आणि वनडे या दोन्ही मालिकांसाठी युवा शुबमन गिल याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळे हार्दिकचं उपकर्णधारपदीही गेलं आहे.





