IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव तरी इंडिया WTC Final मध्ये पोहोचणार; काय आहे समीकरण?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवाचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये बसला. या पराभवानंतर टीम इंडियाची पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. भारताने या सत्रात आतापर्यंत 8 मॅच खेळल्या आहेत, ज्यात त्यांनी 4 मॅच जिंकल्या असून 3 मॅच गमावल्या तर एक सामना ड्रॉ झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सत्रात टीम इंडियाचे आता 10 सामने शिल्लक आहेत.
टीम इंडिया फायनलला पोहोचणार का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रत्येक सामन्यात टीमला विजयांमुळे 12 पॉईंट्स, मॅच ड्रॉ झाल्यास 6 पॉईंट्स आणि पराभव झाल्यास शून्य पॉईंट मिळतात. भारताने आतापर्यंत 8 टेस्ट खेळल्या आहेत, ज्यात 4 विजयांसह भारताने 52 पॉईंट्स मिळवले आहेत, त्यामुळे त्यांची विजयी टक्केवारी 54.17 टक्के एवढी आहे. मागच्या WTC सत्रांवर नजर टाकली तर फायनलला पोहोचण्यासाठी टीमला 64 ते 68 टक्क्यांची विजयी टक्केवारी लागते.
भारताचे उरलेले सामने कुणाविरुद्ध?
भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या उरलेल्या मॅच महत्त्वाच्या ठरणार आहे. गुवाहाटीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटीमध्ये सीरिजची शेवटची मॅच होईल. यानंतर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये त्यांच्या घरच्या मैदानात 2 टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर 2 टेस्ट मॅच होतील, आणि शेवटी घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज होईल. यानंतर टीम इंडिया फायनल खेळणार कि नाही हे स्पष्ट होईल.
काय आहे फायनलचे समीकरण?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला उरलेल्या 10 पैकी किमान 7 मॅच जिंकाव्या लागणार आहेत, ज्यामुळे त्यांचे पॉईंट्स 136 होतील, तसंच त्यांची विजयी टक्केवारी 62.96% होईल. तसंच एक सामना ड्रॉ झाला तर त्यांच्या खात्यात 140 पॉईंट्स होतील. जे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे ठरू शकतात. तसेच जर भारताने 8 विजय मिळवले तर त्यांचे फायनलमधील स्थान निश्चित होईल.





