IND vs SA: अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते; रोहितला जबाबदारी मिळण्याची शक्यता

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. रहाणेची कामगिरी गेल्या अनेक दिवसांपासून खराब दिसून येत आहे. कानपूर येथे नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कामगिरीने टीम इंडियाची निराशा केली. त्याचवेळी मुंबईत खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही.
दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीचे कारण BCCI ने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचे सांगितले. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजिंक्येचे उपकर्णधारपदही हिसकावले जाऊ शकते. भारताचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा पाहता बीसीसीआय उपकर्णधारपदाची जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवू शकते. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार होण्याच्या शर्यतीत हिटमॅन रोहित शर्मा आघाडीवर आहे.
गेल्या वर्षी अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाची सांभाळली होती धुरा
भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान अजिंक्य रहाणेने कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर त्याने कांगारूंच्या भूमीवर ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले होते. विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेत खेळला नाही. गेल्या एक वर्षापासून रहाणेचा खराब फॉर्म दिसून येत आहे. 2021 मध्ये त्याला 12 कसोटी सामन्यांमध्ये 20.35 च्या सरासरीने केवळ 407 धावा करता आल्या.





