IND vs PAK : भारत-पाकिस्तानमध्ये होणार WTC फायनल? जाणून घ्या, संपूर्ण समीकरण…

IND vs PAK WTC Final 2023-25 : अलीकडेच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर पाकिस्तानला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फटका बसला. या पराभवानंतर पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणे कठीण झाले आहे. मात्र, या समीकरणानुसार पाकिस्तान अजूनही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात होऊ शकते का? जाणून घेऊया…
भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागणारा पाकिस्तान आठव्या स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे, तर पाकिस्तानसाठी अंतिम फेरी गाठणे खूप कठीण दिसत आहे. 6 पैकी फक्त 2 सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानची विजयाची टक्केवारी फक्त 30.56 आहे.
तथापि, पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलमध्ये अजून 8 कसोटी खेळायच्या आहेत. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला सर्व 8 सामने जिंकावे लागतील. मात्र, पाकिस्तानसाठी हे सोपे नसेल कारण त्यांना वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या विरोधी संघांविरुद्ध खेळायचे आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होऊ शकते फायनल..
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाने 9 पैकी 6 सामने जिंकले, 2 हरले आणि 1 सामना अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने 12 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 8 सामने जिंकले, 3 हरले आणि 1 सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे.
नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी पाच सामन्यांची ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना देखील भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते.





