IND vs PAK : बुमराहने रौफला क्लीन बोल्ड करत दिले सणसणीत प्रत्युत्तर! अनोख्या सेलिब्रेशनने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

IND vs PAK Jasprit Bumrah plane crash celebration video viral : एसीसी आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तानी संघाला 146 धावांत गुंडाळले आणि सर्व क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. या सामन्यात भारतीय सुपरस्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. बुमराहने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला क्लीन बोल्ड करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर त्याच्या मागील सामन्यातील कृतीला आपल्या सेलिब्रेशनने सणसणीत प्रत्युत्तर दिले.
हारिस रौफने केला होता आक्षेपार्ह इशारा –
सुपर फोर फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यात हारिस रौफने प्रेक्षकांना उद्देशून आक्षेपार्ह इशारा केला होता. त्यावेळी रौफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना काही प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या नावाने त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला उत्तर देताना रौफने फायटर जेट क्रॅशचा इशारा केला होता. या कृतीमुळे आयसीसीने रौफवर 30% मॅच फी दंड म्हणून आकारली होती. फायनलमध्ये बुमराहने रौफला बाद करताना त्याच इशाऱ्याची नक्कल करत विकेटचे सेलिब्रेशन केले, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले.
Bumrah giving it back to Haris Rauf 💀#JaspritBumrah #INDvsPAK #AsiaCupFinal pic.twitter.com/24XDailRiw
— Deepu (@deepu_drops) September 28, 2025
पाकिस्तानी फलंदाजांचा पुन्हा ढेपाळली –
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानी संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. 113 धावांवर केवळ एक गडी बाद झाला होता. मात्र, यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर कुलदीप यादवने 4 गडी बाद करत पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लावला. भारतीय फिरकीपटूंनी पहिल्या 8 गड्यांचा समाचार घेतला, तर शेवटचे 2 गडी बुमराहने बाद केले. परिणामी, पाकिस्तानचा डाव अखेरच्या षटकात 146 धावांत आटोपला.
हेही वाचा – IND vs PAK : साहिबझादा फरहानने रचला इतिहास, बुमराहविरुद्ध ‘ही’ खास कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
बुमराहचे अनोखे सेलिब्रेशन –
बुमराहने सामन्यात केवळ विकेट्सच घेतल्या नाहीत, तर त्याच्या अनोख्या सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले. हारिस रौफला बाद केल्यानंतर त्याने रौफच्या आधीच्या कृतीची नक्कल करत प्रेक्षकांना आणि क्रिकेट विश्वाला आपल्या प्रतिभेची आणि आत्मविश्वासाची झलक दाखवली. भारतीय गोलंदाजांच्या या शानदार कामगिरीमुळे भारताने अंतिम सामन्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आणि चांहत्यांची मन जिंकले.





