IND vs PAK : ज्या पाकिस्तानी गोलंदाजाने वैभवशी पंगा घेतला होता, त्यानेच उडवला भारतीय कर्णधाराचा त्रिफळा! पाहा VIDEO
IND vs PAK : या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १२ षटकांत ३ बाद २२ धावा केल्या आहेत.

IND vs PAK Ali Raza Castles India U19 Captain Lakshya Raichandani : एसीसी अंडर-१९ आशिया कप २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा कर्णधार आणि फॉर्मात असलेला सलामीवीर लक्ष्य रायचंदानी शून्यावर त्रिफळाचीत झाला. भारताच्या कर्णधाराची दांडी गुल करणारा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज अली रझा आहे. गेल्या स्पर्धेत भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीशी मैदानावर भिडल्यामुळे आणि त्याला बाद केल्यामुळे अली रझा चांगलाच चर्चेत आला होता; आता पुन्हा एकदा त्याने भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला आहे.
रणनीती आखून उडवला त्रिफळा; रायचंदानी चक्रव्यूहात अडकला
अली रझाने अत्यंत चतुर रणनीती आखून रायचंदानीला आपल्या जाळ्यात ओढले. पहिल्या चेंडूवर शॉर्ट ऑफ गुड लेंथवरून चेंडू बाहेर काढल्यानंतर, दुसऱ्याच चेंडूवर त्याने त्याच टप्प्यावरून चेंडू अनपेक्षितपणे आत आणला. चेंडू पुन्हा बाहेर जाईल या भ्रमात राहिलेला रायचंदानी चकवा खाल्ला आणि चेंडू थेट त्याच्या स्टंप्सवर आदळला. पहिल्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावून भारताला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधाराची विकेट स्वस्तात गेल्याने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
वैभव सूर्यवंशीसोबतच्या वादाने आला होता चर्चेत –
Ali Raza strikes! First wicket for Pakistan U19 as the Indian opener departs for a duck! 🔥 https://t.co/QZPLyQsX8H
— Mian Ahmad (@MianAhmad_56) November 8, 2026
गेल्या अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम फेरीतही अली रझानेच वैभव सूर्यवंशीला बाद करून सामना फिरवला होता. त्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या वैभवला त्याने बाद केल्यानंतर दोघांमध्ये मैदानावर जोरदार वादावादी झाली होती. वैभव २६ धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव घसरला होता आणि अली रझा व समीर मिन्हास यांनी पाकिस्तानला चॅम्पियन बनवले होते. आता पुन्हा एकदा त्याने भारतीय अव्वल फळीचे कंबरडे मोडले आहे.
१४० किमी प्रतितास वेग अन् अनुभवाची खाण –
Aaryavir Sehwag brings a straight drive, a high elbow and a whole lot of class ✨
Watch #INDvPAK in #AsiaCupU19 LIVE NOW on #SonyLIV & #SonySportsNetwork https://t.co/2UzdlNqF0S
— Sony LIV (@SonyLIV) November 8, 2026
अली रझाचा अंडर-१९ पातळीवर दांडगा अनुभव आहे. तो तिसऱ्यांदा अंडर-१९ आशिया कप खेळत आहे. अत्यंत लहान वयातच वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा रझा ताशी १४० किमीहून अधिक वेगाने चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) पेशावर झाल्मीकडून खेळणारा हा गोलंदाज प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रावळपिंडीचे प्रतिनिधित्व करतो. अवघ्या ८ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याच्या नावावर ३४ विकेट्सची नोंद असून, त्याच्या या अनुभवाचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आहे.





