IND vs NZ Test Series 2024 : भारतात येण्यापूर्वी कर्णधार लॅथमनं आखली जबरदस्त रणनिती, म्हणाला “त्यांच्यावर वर्चस्व राखण्यासाठी….”

India vs New Zealand Test series 2024 : – भारताविरुद्ध बुधवारपासून (16 आॅक्टोबर) सुरु होणाऱ्या तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ सज्ज झाला असून या मालिकेसाठी टॉम लॅथमकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. न्यूझीलंड संघाने श्रीलंका संघाने क्लीन स्वीप दिल्यानंतर कर्णधार टीम साऊदीने कर्णधारपद सोडले होते. न्यूझीलंड क्रिकेटने कर्णधार म्हणून पुन्हा एकदा टॉम लॅथमवर विश्वास दाखविला आहे. भारताला रवाना होण्यापूर्वी लॅथमने भारतात भारतीय संघाला आव्हान द्यायचे असेल म्हणजेच भारताला हरवायचं असेल तर निर्भयपणे खेळावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
शुक्रवारी उशीरा न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रवाना झाला. रवाना होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम म्हणाला की, “भारताचा दौरा नेहमीच रोमांचक आणि आव्हानात्मक असतो. आम्हाला आशा आहे की आम्ही भारतामध्ये मुक्तपणे व धैर्याने खेळून त्यांच्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करू. आम्ही चांगले खेळलो तर आम्हाला विजयाची निश्चित संधी आहे,” असे लॅथम बोलताना म्हणाला.
भारताने मायदेशात खेळताना सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. न्यूझीलंडने भारतामध्ये आतापर्यंत केवळ दोनच लढती जिंकल्या असून यातील शेवटचा विजय त्यांना 1988 मध्ये मिळाला होता. विश्व कसोटी स्पर्धेच्या या हंगामामध्ये सलग चार कसोटी मालिका पराभूत होऊन न्यूझीलंड संघ भारतात दाखल होणार आहे.
यावेळी बोलताना लॅथम म्हणाला की, “भारतात कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळायचे आहे, हे आम्ही ठरवले आहे. भारतासमोर आव्हान निर्माण करण्यासाठी आम्ही काही रणनीती ठरवल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. ज्या संघांनी भारतात आक्रमक खेळ केला, त्यांची भारतात चांगली कामगिरी झाली आहे. त्यामुळे आम्हाला फलंदाजीत आक्रमकता आणावी लागणार आहे.”
श्रीलंका दौरा पूर्ण अयशस्वी नव्हता….
श्रीलंका संघाने न्यूझीलंड संघाला दोन्ही कसोटी लढतीमध्ये पराभूत करून क्लीन स्वीप दिला होता. मात्र, या मालिकेत देखील काही सकारात्मक बाबी आमच्य बाजूने झाल्याने लॅथम म्हणाला. श्रीलंकेत देखील आम्ही चांगली कामगिरी केली, मात्र निकाल आमच्या बाजूने लागला नाही. तरी फलंदाजीतील एक डाव वगळता आम्ही चांगली कामगिरी केली, मात्र यशाने आम्हाला हुलकावणी दिल्याचे लॅथम म्हणाला.





