Champions Trophy 2025 Final : आयसीसीची फायनलपूर्वी मोठी घोषणा, IND vs NZ सामन्याची जबाबदारी ‘या’ दिग्गजांवर सोपवली

Champions Trophy 2025 Final Match Umpire list : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना रविवार, ९ मार्च रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे दोन्ही संघ आपापल्या सरावात व्यस्त आहेत. पण त्याआधी आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. आता आयसीसीने या अंतिम सामन्यात पंच आणि सामनाधिकारी कोण असणार आहेत? त्यांची नावं जाहीर केली आहेत.
फायनल सामन्यासाठी पंचांची यादी जाहीर –
रविवारी दुबईत होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी आयसीसीने चार पंच आणि सामनाधिकारींची यादी जाहीर केली आहे. या सामन्यादरम्यान पॉल रीफेल आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानी पंचांची भूमिका बजावताना दिसतील. जोएल विल्सन हे सामन्याचे तिसरे पंच असतील, तर कुमार धर्मसेना हे चौथे पंच असतील. तर रंजन मदुगले हे मॅच सामनाधिकारी भूमिका साकारताना दिसतील. लाहोरमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड उपांत्य सामन्यात पॉल रीफेल यांनी मैदानावर पंच म्हणून काम पाहिले. तर रिचर्ड इलिंगवर्थ दुबईतील भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्यात सहभागी झाले होते.
रिचर्ड इलिंगवर्थ हे भारतासाठी एक चांगले पंच –
Match officials named for the #ChampionsTrophy 2025 grand finale between India and New Zealand.
Read more ➡️ https://t.co/DJob447FFq pic.twitter.com/EEQconrwC9
— ICC (@ICC) March 6, 2025
विशेष म्हणजे आतापर्यंत रिचर्ड इलिंगवर्थ हे भारतासाठी एक चांगले पंच मानले जातात. कारण २०२४ मध्ये जेव्हा भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा त्यांना या सामन्याचे पंच म्हणून काम देण्यात आले होते. या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती. मात्र, याआधी ते पंच असताना भारताला पराभव पत्करावे लागले होते. रिचर्ड इलिंगवर्थ यांना चार वेळा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम पंच पुरस्कारही मिळाला आहे.
फायनल सामन्यासाठी पंचांची निवड उशीरा का होते?
खरंतर, आयसीसी स्पर्धेच्या अंतिम आणि उपांत्य फेरीसाठी पंचांची घोषणा नंतर केली जाते. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी संघ आधीच ठरवले जात नाहीत. संघ ठरवताना, सामना खेळवण्यात येणाऱ्या दोन्ही संघांच्या देशातील पंच नसावेत याची काळजी घेतली जाते. यावेळी भारत आणि न्यूझीलंड हे संघ अंतिम सामना खेळत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांच्या पंचांना पॅनेलमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. दोन्ही संघ कोणत्या प्रकारचा खेळ दाखवतात आणि कोणता संघ चॅम्पियन बनतो हे पाहणे बाकी आहे.





