IND vs NZ 1st Test : बेंगळुरू कसोटीवर पावसाचे सावट, हवामान खात्याने दिला ‘हा’ अलर्ट…

IND vs NZ 1st Test (Bengaluru, Weather Forecast) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. बुधवारपासून(16 आॅक्टोबर) हा सामना सुरू होत आहे. भारतीय संघ नुकताच बांगलादेशला पराभूत करून परत येत आहे तर न्यूझीलंडला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला.
न्यूझीलंडसाठी कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. पण, सामना सुरू होण्यापूर्वीच बेंगळुरूमधील खराब हवामानामुळे चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या बंगळुरूमध्ये पाऊस (Bengaluru Weather Forecast) पडत असून पुढील दोन-तीन दिवस हवामान खराब राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सामन्याची अवस्था कानपूरमध्ये बांगलादेशविरूध्द खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यासारखी होऊ शकते. म्हणजे पूर्ण पाच दिवस सामना खेळला जाण्याची शक्यता कमी वाटते.
खराब हवामानामुळे वाढली चिंता…
बंगळुरूचे हवामान सध्या खूपच खराब आहे. तेथे गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. विशेषत: 16 ते 18 ऑक्टोबरपर्यंत हवामान निरभ्र असण्याची अजिबात शक्यता नाही, परंतु या 3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर आपण हवामानाचा अंदाज पाहिला तर, पुढील एक आठवडा बेंगळुरूमध्ये पाऊस पडू शकतो. अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 16 ऑक्टोबरपासून सुरू होणारा पहिला कसोटी सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो. होय, जर बेंगळुरूमधील हवामान साफ झाले नाही तर चाहत्यांच्या हाती निराशा लागण्याची शक्यता आहे.
कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पावसाची 70% ते 90% शक्यता आहे. याशिवाय जोरदार वारेही वाहू शकतात आणि आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. बेंगळुरूच्या काही भागांसह कर्नाटक राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी बंगळुरूमध्ये पाऊस पडला. अशा स्थितीत येत्या काही दिवसांत पाऊस असाच सुरू राहिल्यास हा कसोटी सामना अनिर्णित राहू शकतो.
It’s raining in Bengaluru the day before India’s first Test against New Zealand 🌧️ pic.twitter.com/DGIhzeTnDb
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 15, 2024
ईएसपीएन क्रिकइन्फो (ESPNcricinfo) च्या बातमीनुसार, पहिल्या कसोटीच्या एक दिवस आधी भारताचे सराव सत्र रद्द करावे लागले. जे सकाळी 9.30 वाजता ठरले होते, कारण मुसळधार पाऊस पडत होता. भारतीय हवामान खात्याने बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून त्याचा कसोटी सामन्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था उत्तम…
बेंगळुरूच्या खराब हवामानाचा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. पण, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एम चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था उत्तम आहे. अशा परिस्थितीत पाऊस थांबल्यानंतर काही तासांतच सामना सहज सुरू होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही, कारण चांगल्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे बेंगळुरूमध्ये खेळ होण्याची आशा आहे.
दोन दिवस मिळाले तरी येऊ शकतो निकाल…
भारतीय क्रिकेट संघ कानपूरमध्ये बांगलादेशसोबत कसोटी सामना खेळला. त्या सामन्यातील अडीच दिवस पावसाने वाया घालवले, पण त्यानंतर रोहित शर्मा आणि कंपनीने तुफानी खेळ करत सामना निकालापर्यंत नेला. अशा परिस्थितीत, बंगळुरूमधील 5 दिवसीय कसोटी सामन्यातील काही दिवस पावसाने खराब केले तर काळजी करण्याची गरज नाही. कारण, तुम्हाला अल्पावधीतच तसाच एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. पण सर्वकाही हवामानावर अवलंबून आहे त्यामुळे आता पुढे काय घडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



